अक्कलकोट रोड एमआयडीसीत अग्निशामक केंद्राचे बांधकाम सुरू

fire engine, fire fighter, fighting-23774.jpg

अक्कलकोट रोड एमआयडीसीत 

अग्निशामक केंद्राचे बांधकाम सुरू

अग्निशमन जवान, चालकांसाठी 4 निवासस्थानाचीही सुविधा करणार उपलब्ध

  सोलापूर :  येथील अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये लागणाऱ्या आगीवर तात्काळ नियंत्रण आणण्यासाठी कायमस्वरुपी अग्निशमन केंद्र बांधण्यात येत आहे. तातडीने अग्नीशामक यंत्रणा सज्ज होणार आहे.

         येथील अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये कारखान्यांना आगी लागण्याचे प्रमाण मोठे आहे. एखादी आग लागल्यास येथे रविवार पेठेतील मुख्य केंद्रातून अग्निशमन बंब येण्यास १०-१५ मिनिटांचा अवधी लागायचा. तोपर्यंत आग वाढतच असल्याने मालमत्तांची हानी व्हायची. त्यामुळे या एमआयडीसीमध्ये अग्निशमन केंद्राची सोय करण्याची उद्याजकांची मागणी होती. हे लक्षात घेऊन अनेक वर्षांपूर्वी महापालिका सभेत एमआयडीसीत अग्निशमन केंद्र उभारण्याचा ठराव झाला होता. याशिवाय अंदाजपत्रकीय सभेतही यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता मात्र जागेची अडचण असल्याने केंद्राची उभारणी होऊ शकली नव्हती. 

        दरम्यान, या पार्श्वभूमीवर सुमारे तीन वर्षांपूर्वी एमआयडीसीमधील पाणी टाकी नजीकच्या जागेत तात्पुरते अग्निशमन केंद्र उभारण्यात आले होते. या ठिकाणी केवळ दिवसा एका अग्रिशमन बंबाची सोय करण्यात आली होती. सेवकांसाठी विश्रांतीकक्ष आदींचा अभाव होता. या केंद्राची सोय केवळ दिवसाच असल्याने रात्रीच्या वेळी आग लागल्यास या केंद्राचा उपयोग होत नव्हता. त्यामुळे या  अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये कायम अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी पुढे आली होती. यावर महापालिकेकडून एमआयडीसीकडे जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यास गतवर्षी मंजुरी मिळाली होती. यानुसार तीन हजार स्क्वेअर फुटांची जागा एमआयडीसीकडून महापालिकेला मिळाली आहे. या जागेवर अग्निशमन केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. सध्या संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर वाहनतळ व निवासस्थान उभारण्यात येणार आहे.

        हे केंद्र सुरू झाल्यावर एमआयडीसीमध्ये एखादी आग लागल्यास अवघ्या काही मिनिटांत अग्नीशामक वाहन यंत्रणा उपलब्ध होणार आहेत. परिणामी आगीवर वेळेवर नियंत्रण मिळवणे व आगीपासून मालमत्तांचा बचाव करणे शक्य होणार आहे. 

शेजारीच पाणी आहे उपलब्धता

अक्कलकोट रोड एमआयडीसीतील पाण्याच्या टाकीजवळ हे अग्निशमन केंद्र उभारण्यात येत आहे. या ठिकाणीच महापालिकेच्या पाण्याचा संप आहे. या संपातून अग्निशमन दलाच्या बंबांमध्ये पाणी भरण्याची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे रिकामे बंब तातडीने भरण्यासाठी एक उपलब्धी झाली आहे.

 कर्मचाऱ्यांसाठी येथे निवासाची सोय

या अग्नीशमन केंद्रात दोन बंब उभारण्यासाठी  वाहनतळही करण्यात  येत आहे. शिवाय अग्निशमन जवान, चालकांसाठी 4 निवासस्थानाचीही सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. त्यामुळे या अग्निशमन केंद्राला 24 तास मनुष्यबळाची उपलब्धता होण्यास मदत होणार आहे. अनेक वर्षापासूनची गरज पुर्ण होत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *