
हैदराबाद रोड मार्केट यार्ड परिसरातील काढले अतिक्रमण
चार चाकी हात गाड्या, वजन काटे व इतर साहित्य केले जप्त
सोलापूर : महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने आज हैदराबाद रोड मार्केट यार्ड परिसरातील रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविण्यात आले. पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साह्याने ही कारवाई करण्यात आली.
महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात रहदारीस अडथळा ठरणारे तसेच फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम नियमितपणे सुरू आहे. या मोहिमेअंतर्गतच आज सोलापूर शहरातील गजबजलेल्या अशा हैदराबाद रोड , मार्केट यार्ड परिसरातील रस्त्यालगतचे अतिक्रमण काढण्यात आले.
या कारवाईत चार चाकी दोन हात गाड्या, चार वजन काटे व इतर साहित्य जप्त करण्यात आले तसेच रस्त्यालगतचे अतिक्रमित पत्रा शेड जेसीबीच्या साह्याने निष्काषित करण्यात आले आहे, अशी माहिती अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक मुर्तुजा शहापुरे यांनी दिली.
सोलापूर शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी रस्त्यावर तसेच फुटपाथवर अतिक्रमण करू नये. अतिक्रमण आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा या विभागाचे अधीक्षक मुर्तुजा शहापुरे यांनी दिला आहे.
——