
दोन खोके, चार चाकी हात गाडी केली जप्त
सोलापूर : महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने विजापूर रोडवरील अशोक नगर परिसरातील मागासवर्गीय मुला – मुलीच्या वसतिगृहासमोरील अतिक्रमण आज काढण्यात आले. पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.
सोलापूर महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने शहरात सातत्याने अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. विजापूर रोडवरील फुटपाथवर अनधिकृतपणे रहदारीस अडथळा येईल अशा प्रकारे भाजी आणि फळ विक्री करणाऱ्या विरोधात महापालिकेच्या पथकाकडून रोज कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, आज शुक्रवारी अतिक्रमण प्रतिबंधक पथकाने विजापूर रोड येथील अशोक नगर परिसरातील मुला-मुलींच्या मागासवर्गीय वसतीगृहासमोर असलेले अतिक्रमण काढले. अनधिकृतपणे खोके आणि चार चाकी हातगाडी लावण्यात आली होती. वसतीगृहासमोरील दोन लोखंडी खोके आणि एक चार चाकी हात गाडी जप्त करण्यात आली. तर जेसीबीच्या साह्याने एक लोखंडी खोका निष्काशीत करण्यात आला. पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबविण्यात आली.
सोलापूर शहरात फुटपाथवर आणि रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमण आढळून आल्यास जप्तीची कारवाई करण्यात येईल. स्वच्छ व सुंदर सोलापूरसाठी नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रभारी प्रमुख मुर्तुजा शहापुरे यांनी केले आहे.