
स्वच्छतेत सोलापूरला देशात ५ व्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न
सोलापूरचे पत्रकारिता उच्चतम दर्जाची
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांचे प्रतिपादन
आर्यनंदी आदर्श पत्रकार पुरस्काराचे थाटात वितरण
सोलापूर : सोलापूरची पत्रकारिता ही उच्चतम दर्जाची आहे. समाजभान आणि समाज हित जोपासणारी विकासात्मक पत्रकारिता आहे. सोलापूर शहरात स्वच्छता मोहीम सुरूच राहणार आहे. भविष्यात 140 रस्त्यांची स्वच्छता करणार असून भारतात सोलापूर शहर स्वच्छतेमध्ये पहिल्या पाचव्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे प्रतिपादन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी केले.
आर्यनंदी परिवार संचलित आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्था व आर्यनंदी एज्युकेशन अॅन्ड रिसर्च फौंडेशन, सोलापूरच्या वतीने आर्यनदी नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्ष आणि पत्रकार दिनानिमित्त आर्यनंदी आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी शिवस्मारक सभागृहात थाटात पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवि पवार याच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आर्यनंदी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेश फडकुले,आर्यनंदी निधी च्या संचालिका डॉ. शिल्पा फडकुले, दैनिक तरूण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे,
दैनिक पुढारीचे आवृत्ती प्रमुख संजय पाठक, महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे, निवड समिती सदस्य दिव्य मराठीचे उपसंपादक विजय गायकवाड, उपाध्यक्ष बाहुबली दुरूगकर, संस्थेचे संचालक प्रा. प्रेमचंद मेने आदी मान्यवर उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त रवी पवार पुढे म्हणाले,
सोलापुरात महापालिकेच्या वतीने ११७ रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. नागरिकांनी स्वच्छतेसाठी सहकार्य करावे. विद्यार्थ्यांचे वाचन कमी झाले आहे. वाचन संस्कृती वृद्धीगत झाली पाहिजे. पत्रकार समाजप्रबोधन करतात. चुकीच्या व चांगल्या गोष्टी समाजासमोर आणतात. सोलापूरला पत्र महर्षी रंगाअण्णा वैद्य यांच्यासह पत्रकारितेची चांगली परंपरा आहे. वृत्तपत्राचे महत्त्व कमी होणार नाही, असेही ते म्हणाले.
यावेळी संपादक प्रशांत माने म्हणाले, आर्यनंदी परिवाराने समाज जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत विविध क्षेत्रात कौतुकास्पद कार्य केले आहे. यावेळी अध्यक्ष विक्रम खेलबुडे त्यांच्यासह सत्कारमूर्तींची भाषणे झाली.
प्रास्ताविक भाषणात संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेश फडकुले म्हणाले , मागील २५ वर्षापासून ही पतसंस्था कार्यरत असून, स्थापनेपासून आँडीट वर्ग अ मध्ये आहे. पतसंस्था फक्त आर्थिक क्षेत्रातच कार्यरत न राहता सामाजिक, सहकार, साहित्य, आरोग्य, शैक्षणिक, कला व क्रीडा अशा सर्व क्षेत्रात परिवर्तनशील व उल्लेखनीय कार्य करत असल्याचे सांगितले.
प्रारंभी प. पू. १०८ आचार्य आर्यनंदी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विजय गायकवाड यांनी पत्रकारितेवर कविता सादर केली. सूत्रसंचालन दिपाली दुरुगकर यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक प्रा. प्रेमचंद मेने यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे संचालक निलेश एखंडे, मनोहर नारायणकर, प्रविण बुर्से, अनुपमा रणदिवे सल्लागार सदस्य मोहनदास गुमते, अशोक भालेराव, मंजिरी सवळे, विलास कटके व आर्यनंदी परिवार सर्व संचालक, सदस्य व पत्रकार कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्य कार्यकरी अधिकारी वैभव आहेरकर, व्यवस्थापिका लक्ष्मी आरगी, राधिका बिल्लमपल्ली, सतीश शिंदे, बसवराज परचंडे, लावण्या आडम, किरण येरगुंटला, चंद्रिका चौगुले, रवी काटकर, नितीन सरसमकर, कविता माने, प्रकाश माशाळकर, ओमकार पलसे यांनी परिश्रम घेतले.
यांचा झाला पुरस्काराने सन्मान
‘आर्यनंदी आदर्श पत्रकार पुरस्कार २०२५’ने
यंदाच्या वर्षी संजय जाधव (दिव्य मराठी), संतोष चितापुरे (संचार), रामेश्वर विभुते (सकाळ), काशिनाथ वाघमारे (लोकमत), विजय थोरात (पुढारी), संतोष अचलारे (तरुण भारत संवाद), तर ‘आर्यनंदी आदर्श पत्रकारिता विशेष गौरव पुरस्काराने चंद्रकांत मिराखोर (दिव्य मराठी), सादिक इनामदार (पुण्य नगरी) यांना गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, शाल , पुष्पगुच्छ व भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
शहरातील बाजारपेठांमध्ये
रात्री करणार स्वच्छता
भविष्यात १४० रस्त्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. दरम्यान शहरातील २६ बाजारपेठ निवडण्यात आले असून या ठिकाणी रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत स्वच्छतेची कामे हाती घेण्यात येणार आहेत.येत्या सोमवारी त्याचा शुभारंभ होईल. कचरा व प्लास्टिक मुक्त सोलापूर शहर करण्याचा आमचा संकल्प आहे, असेही अतिरिक्त आयुक्त रवी पवार म्हणाले.