उपमुख्यमंत्री फडणवीसांचा एड. बनसोडेंना फोन, म्हणाले तुम्ही तयारीत आहात का ?

एड. बनसोडे म्हणाले, है तयार हम !
भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीत एड. बनसोडे यांच्या नावावर सकारात्मक चर्चा !
सोलापूरच्या रण मैदानात बनसोडे यांना उतरवण्याच्या हालचालींना वेग !
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण ? याबाबत इच्छुकांची भाऊ गर्दी आहे मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी खा. एड. शरद बनसोडे यांना फोन केला आणि म्हणाले, तुम्ही तयारीत आहात का ? यामुळे आता भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीत ऍड. बनसोडे यांच्या उमेदवारी बाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे समजते. सोलापूरच्या रण मैदानात शरद बनसोडे यांना उतरवण्याच्या हालचालींना वेग आला असल्याचे दिसून येते. एड. बनसोडे यांच्या रूपात स्थानिक उमेदवारांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. शेजारच्या माढा मतदारसंघात उमेदवार जाहीर केला मात्र सोलापूर लोकसभा मतदारसंघात अद्याप उमेदवार जाहीर केला नाही. सोलापूर लोकसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची मांदियाळी आहे. दरम्यान, काही इच्छुक उमेदवार भाजपातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी घेत आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात माजी खा. एडवकेट शरद बनसोडे , माजी खा. अमर साबळे यांच्यासह काही इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. दरम्यान, माळशिरसचे भाजपाचे आ. राम सातपुते यांचे नाव आघाडीवर असल्याची बातमी चर्चिली जात आहे.
भाजपाचे माजी खा. ऍड. शरद बनसोडे यांनी सोलापूर महापालिकेत आल्यानंतर स्थानिक उमेदवार द्यावा तसेच ओरिजनल दाखले वाला उमेदवार पक्षाने द्यावा अशी आग्रही मागणी केली होती. ओरिजनल दाखलेवाला, बाहेरचा उपरा उमेदवार नको, स्थानिक उमेदवारांना संधी द्यावी अशी आग्रही मागणी इच्छुक उमेदवार व इतरांकडून भाजपाकडे करण्यात येत आहे. यामुळे भाजपाने सोलापुरातील उमेदवार निश्चित करण्यास विलंब केला असल्याचे बोलले जात आहे. विद्यमान खासदारांच्या जात दाखल्यावरून आरोप होत आहेत.
यादरम्यान, सोलापुरातील उमेदवाराची चाचपणी करण्यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी काल दौरा केला. तत्पूर्वी राज्यसभेचे नूतन खा. डॉ. अजित गोपछडे यांनीही माहिती घेतली होती. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी सोलापूर मतदारसंघाची साधक बाधक चाचपणी केली आहे. विविध सर्वेही केले आहेत. एकूणच या लोकसभा निवडणुकीत सोलापुरातून स्थानिक उमेदवार आणि ओरिजनल दाखले वाला उमेदवार द्यावा या मागणीचा विचार भाजपाकडून होत असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान आज मुंबईत सोलापूर लोकसभा उमेदवारीबाबत कोअर कमिटीची बैठक झाली. यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे इच्छुक उमेदवार माजी खा. एड. शरद बनसोडे यांना फोन केला. त्यांच्या समवेत चर्चा केली आणि म्हणाले तुम्ही तयारीत आहात का? आपल्या नावाची चर्चा करण्यात येत आहे. त्यावर एड. शरद बनसोडे यांनी होय मी तयार आहे असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितले.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीबाबत एड. शरद बनसोडे यांच्या नावाची सकारात्मक चर्चा झाली असल्याचे समजते. सोलापूरच्या रण मैदानात 2014 नंतर पुन्हा यंदाच्या निवडणुकीत ऍड. बनसोडे यांना उतरवण्याच्या हालचालीला भाजपात वेग आला असल्याचे संकेत आहेत.
सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सोलापुरातून ऍड. शरद बनसोडे यांनी काँग्रेसचे काँग्रेसचे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव करत जायंट किलर ठरले होते.