
ऐतिहासिक वास्तू आवारातील शौचालयाचे बांधकाम त्वरित रद्द करा
इंटॅक सोलापूर शाखेची निवेदनाद्वारे मागणी
सोलापूर : सुलभ शौचालय ही नागरिकांची गरज आहे,परंतु ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वास्तु परिसरात ते बांधणे अत्यंत अनुचित आहे. त्यामुळे पारतंत्र्यातही तिरंगा ध्वज फडकलेल्या नवी पेठेतील जुन्या नगरपालिकेच्या इमारत आवारात सुरू असलेले सुलभ शौचालयाचे बांधकाम त्वरित रद्द करावे, अशी आग्रही मागणी इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चर हेरिटेज ( इंटॅक) सोलापूर शाखेच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.
सोलापूर शहरातील तत्कालीन नगरपालिकेच्या इमारतीवर पारतंत्र्यातही तिरंगा ध्वज फडकवण्यात आला होता. येथील तिरंगा ध्वज उतरवण्यास नकार दिल्याने ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तत्कालीन नगराध्यक्ष माणिकचंद शहा यांना शिक्षा सुनावली होती. क्रांतिकारी असा इतिहास या इमारतीचा आहे. या इमारतीच्या आवारात महापालिकेच्या वतीने सुलभ शौचालयाचे बांधकाम सुरू आहे.
बाजारपेठेत सुलभ शौचालय ही नागरिकांची मूलभूत गरज आहे अशी अजब भूमिका महापालिका अधिकाऱ्यांची आहे. या बांधकामास विविध संघटना, माजी नगरसेवक व सुजाण नागरिकांचा तीव्र विरोध होत आहे.
दरम्यान, सोलापुरातील इंटॅक शाखेने येथील शौचालयाच्या बांधकामात विरोध दर्शविला आहे. याबाबत महापालिका नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही इमारत शहरातील पहिली सार्वजनिक इमारत होती. शिवाय मार्शल लॉ घटनेपूर्वी इथे भारताचा तिरंगा फडकवला गेला. त्यासाठी अनेकांनी प्राण पणाला लावले होते. सोलापूरातील स्वातंत्र्य लढ्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका या वास्तूने बजावली आहे.
जुनी नगरपालिका इमारत परिसरात सुलभ शौचालय बांधण्याची प्रक्रिया सुरु आहे. जुनी नगरपालिका इमारत परिसर स्थानिक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून तो सोलापूर शहराच्या प्रस्तावित ऐतिहासिक वारसा यादीत ग्रेड १ विभागात आहे. ही इमारत शहरातील पहिली सार्वजनिक इमारत होती. शिवाय मार्शल लॉ घटनेपूर्वी इथे भारताचा तिरंगा फडकवला गेला. त्यासाठी अनेकांनी प्राण पणाला लावले होते. सोलापूरातील स्वातंत्र्य लढ्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका या वास्तूने बजावली आहे.
त्यामुळे आता आहे त्या स्वरुपात तिची दुरुस्ती करून ती सांभाळणे आवश्यक आहे. सुलभ शौचालय ही नागरिकांची गरज आहेच, परंतु या परिसरात ते बांधणे अत्यंत अनुचित आहे. हेरीटेज समितीमध्ये विषय मांडून चर्चा झाल्याशिवाय वारसा यादीत समाविष्ट वास्तूंसंदर्भात कसलेही निर्णय घेऊ नयेत. अशी अपेक्षा आहे. या चर्चेवेळी गरज पडल्यास या इमारतीचे ऐतिहासक महत्व जाणून घेण्यासाठी इंटॅक सोलापूर विभाग समन्वयक व सदस्यांना आमंत्रित केले जावे. तरी तेथील शौचालयाचे बांधकाम त्वरित रद्द करण्यात यावे, असे इंटॅक सोलापूरच्या समन्वयक आर्किटेक्चर सीमंतिनी चाफळकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
या परिसराचे पावित्र्य,
महात्म्य जपावे : चाफळकर
सोलापूरच्या ऐतिहासिक वारसा जतन, संवर्धनाची संपूर्ण जबाबदारी नगर रचना विभाग, हेरीटेज समिती व महानगरपालिकेची आहे. ही जबाबदारी आपण योग्य रीतीने पार पाडावी. त्वरित या शौचालय बांधकाम रद्द करून या परिसराचे पावित्र्य आणि महात्म्य जपावे, अशी अपेक्षा सीमंतिनी चाफळकर यांनी व्यक्त केली आहे.