कचरा डेपोतील आग 75 टक्के विझली मात्र 

कचरा डेपोतील आग 75 टक्के विझली मात्र 

वाऱ्यामुळे धुराचे प्रमाण वाढले 

आग विझवण्यासाठी 11 दिवसात 500 गाड्या पाणी वापर 

 सोलापूर :  तुळजापूर रोडवरील कचरा डेपोस  लागलेली आग अकराव्या दिवशी साधारणतः 75 टक्के विझली आहे. मोठ्या वाऱ्यामुळे मात्र धुराचे प्रमाण वाढले आहे. महापालिका अग्निशामक दलाच्या वतीने  शर्तीचे प्रयत्न सुरू असून आत्तापर्यंत सुमारे 500 पाण्याच्या गाड्यांचा वापर करण्यात आला आहे. मोठ्या पावसाची गरज आहे, अशी माहिती महापालिका अग्निशामक दलाचे प्रमुख केदारनाथ आवटे यांनी दिली. 

        तुळजापूर रोडवरील बायो एनर्जी प्रकल्प येथील कचरा डेपोस शुक्रवारी 3 मे 2024 रोजी सायंकाळी आग लागली.  अधिक तापमानामुळे कचर्‍यातील मिथेन वायू पेट घेऊन ही आग लागली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येथील एकूण 54 एकर जागेपैकी सुमारे 25 एकर परिसर या आगीने 

 पेट घेतला होता. महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका अग्निशामक दलाचे प्रमुख केदारनाथ आवटे यांच्या नियंत्रणाखाली आग विझवण्यासाठी फायर फायटर गेली 11 दिवस युद्ध पातळीवर कार्यरत आहेत. धुराचे लोट व दुर्गंधी दूरवर पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.         

             दरम्यान, दररोज 50 ते 60 पाण्याच्या गाड्या अशा पद्धतीने या 11 दिवसात एकूण 500 पाण्याच्या गाड्यांचा वापर आग विझवण्यासाठी करण्यात आला आहे. अग्निशामक दलाचे जवान युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहेत.कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर सध्या पाण्याचा मारा करण्यात येत आहे, असे अग्निशामक दलाचे प्रमुख केदारनाथ आवटे यांनी सांगितले.

       गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कचरा उडून  खालचा विस्तव वर येऊन पुन्हा धूर निर्माण होत आहे. अग्निशामक दलाच्या गाड्यांद्वारे पाण्याचा मारा सुरूच आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची गरज आहे. सद्यस्थितीत 75 टक्के आग विझली आहे. या पावसामुळे आग पूर्णपणे विझण्यास मदत होणार असल्याचेही अग्निशामक दलाचे प्रमुख आवटे यांनी सांगितले.

  कॅनॉलचे पाणी वापरण्यास

 परवानगी नाकारली

कचरा डेपो येथील आग विझवण्यासाठी कॅनॉलचे पाणी घेऊन पंपाद्वारे मारण्याचे नियोजन होते. त्यासाठी जलसंपदा विभागाची परवानगी मागितली होती मात्र सध्याच्या स्थितीत पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतल्याने येथे कॅनॉलचे पाणी वापरता येणार नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे अग्निशामक दलाच्या गाड्यांद्वारेच ही आग विझवण्यात येत आहे.

 कचरा वेचणाऱ्या महिलांना 

 डेपो परिसरात केला मज्जाव 

या ठिकाणी सुमारे 40 ते 50  कचरा वेचणाऱ्या महिला येतात. लोखंड भंगार शोधण्यासाठी या महिला खुरप्याने कचरा विस्कटतात.आतील विस्तव वर येतो आणि वाऱ्यामुळे पुन्हा आग धुमसण्याची शक्यता आहे. यामुळे दक्षतेसाठी या परिसरात कचरा वेचणाऱ्या महिलांना येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मात्र तरीही दुसऱ्या बाजूने या महिला येत असल्याचे दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *