कलाक्षेत्राचे वैभव असलेल्या भागवत चित्र मंदिरला ठोकले सील !

मिळकतकर थकबाकी पोटी शहरातील दोन कार्यालयांसह 9 गाळे  सीलबंद

महापालिका पथकाकडून 21 नळ तोडण्याची कारवाई

सोलापूर  : महापालिका मिळकत कर विभागाच्या विविध पथकांकडून आज शहरातील सुप्रसिद्ध अशा मुरारजी पेठ येथील भागवत चित्र मंदिरला 2 लाख 67 हजार रुपये थकबाकी पोटी सील लावण्यात आले.  शहरात इतर पेठांमधील दोन कार्यालय आणि नऊ गाळे सील करण्यात आले तर विविध मिळकतींवरील 21 नळ तोडण्यात आले आहेत. आज दिवसभरात 6 लाख 69 हजार 985 रुपये विविध पथकांकडून कर वसूल करण्यात आला आहे.

         महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत  कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकाच्या माध्यमातून मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी महापालिका प्रशासनाकडून दि. 1 मार्च 2024 पासून सील व नळ बंद कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे.

       दरम्यान, आजच्या सहाव्या दिवशी सोलापूर शहरात विविध ठिकाणी वसुली पथकांनी बेधडक कारवाई केली. यामध्ये सोलापूर शहरातील  सुप्रसिद्ध असे चित्रपट गृह असलेले मुरारजी पेठ येथील भागवत चित्रमंदिरला दोन लाख 67 हजार 811 रुपये थकबाकी पोटी सील ठोकण्यात आले. गेल्या अनेक दशकापासून सोलापूरच्या कला क्षेत्राचे वैभव असलेल्या आणि अनेक दिग्गज सिने कलावंतांनी भेट दिलेल्या या भागवत चित्रमंदिरला महापालिकेने आज सील ठोकले. 

         त्याचबरोबर मुरारजी पेठ येथील कृष्णराज शशिकांत भागवत यांच्याकडील दोन लाख 88 हजार 761 रुपये थकबाकी पोटी कार्यालय सिल केले आहे. उत्तर कसबा येथील बेसकर यांच्या दोन लाख 31 हजार 436 रुपये कर थकबाकी पोटी कार्यालय सील केले आहे. जोडभावी पेठ येथील नरसू हणमंतू वडार यांच्याकडील दोन लाख 24 हजार 916 इतक्या थकबाकी पोटी त्यांचे तीन गळे सील करण्यात आले तसेच सात रस्ता परिसरातील उत्तर सदर बाजार येथील अब्दुल करीम वकील यांच्या मिळकतीवरील कर व नळ वरील एक लाख 30 हजार 500 रुपये थकबाकी पोटी एकूण 6 गाळे सील करण्याची कारवाई केली आहे. अशाप्रकारे आज दिवसभरात एकूण नऊ गाळे आणि दोन कार्यालय सील करण्यात आली आहेत.  त्याचबरोबर विविध पेठांमधील एकूण 21 नळ कनेक्शन तोडण्यात आले आहेत. 

           बुधवारी वसुली पथक निहाय केलेली वसुलीची रक्कम आणि नळ बंद व  सील कारवाई याप्रमाणे – पथक क्रमांक  1- वसुली 35 हजार 416 रुपये , पथक क्रमांक 2- वसुली 70 हजार रुपये- 3 नळ बंद – भागवत चित्रमंदिर व दोन कार्यालय सिल, पथक क्रमांक तीन – वसुली 90 हजार 810 रुपये – तीन गाळे सील , पथक क्रमांक चार -वसुली 00 – 3 नळबंद , पथक क्रमांक 5 – वसुली- 65 हजार रुपये रुपये – 1 नळ बंद , पथक क्रमांक 6 – वसुली- 1लाख 57 हजार 609 रुपये  ,पथक क्रमांक 7- वसुली- 1 लाख 56 हजार 150 रूपये – 7 नळबंद , पथक क्रमांक 8- वसुली- 40 हजार  रुपये -2 नळ बंद,  पथक क्रमांक 9- वसुली  55 हजार रुपये – 3 नळ बंद – 6 गाळे सील असे पथकांकडून एकूण 6 लाख 69 हजार 985 रुपये कर वसुली झाली आहे. तर 21 मिळकतीवरील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. 

       थकबाकीदारांनी कटू कारवाई टाळण्यासाठी आपली मिळकत कराची थकबाकी भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *