
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी उभारली मतदान जागरूकतेची संकल्प गुढी
सोलापूर : पांढरे वस्ती येथील महापालिका शाळा क्रमांक पाच येथे गुढीपाडव्याचे औचित्य साधून मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत गुढीपाडवा मतदान वाढवा हा संदेश देणारी संकल्प गुढी उभारण्यात आली.
परंपरेप्रमाणे स्वच्छ काठी, कडुनिंबाच्या डहाळी, नवे कापड , फुलांची माळ, साखरेचा हार याच्या जोडीला “मतदान करूया सात मेला” हा संदेश देणारा फलक हार देखील गुढीला घालण्यात आला होता.जेणेकरून या गुढीपाडवा सणाप्रमाणेच मतदान देखील हा एक उत्सव आहे.उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा असे घरोघरी ब्रीदवाक्य लोकांपर्यंत पोहोचवावे. लोकांना आपल्या पारंपारिक सणाप्रमाणे मतदान करणे हे देखील पवित्र कार्य आहे. याची जाणीव करून द्यावी.या उद्देशाने शाळेमध्ये गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मतदान जागरूकतेची संकल्प गुढी उभारण्यात आल्याचे मुख्याध्यापक अमोल भोसले यांनी सांगितले.
ही गुढी उभा करण्यासाठी किरण शेळके यांनी सहकार्य केले.