
जिल्हा परिषद प्रवेशद्वारालगतच्या 26 खोक्यांवर फिरवला जेसीबी
महापालिका व पोलीस प्रशासनाची कारवाई
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या पुनम गेट समोर उजव्या व डाव्या बाजूच्या फुटपाथ वरील अनधिकृत सुमारे 26 खोक्यांवर जेसीबी फिरवण्यात आला. तगड्या पोलीस बंदोबस्तात सोलापूर महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने ही मोठी कारवाई करण्यात आली. यावेळी अनधिकृत खोकेधारकांनी वेळ मागत कारवाई थांबविण्यासाठी प्रयत्न केला मात्र प्रशासनाने ते नाकारत कारवाई केली.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आजू – बाजूला (पुनम गेट ) विविध प्रकारची आंदोलने करण्यात येतात. या आंदोलनासाठी बाजूला जागा कमी पडत आहे. पोलीस प्रशासन आणि महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने ही कारवाईची मोहीम गुरुवारी सकाळपासूनच राबविण्यात आली. महापालिका अतिक्रमण विभागाच्या विभागाचा जेसीबी तसेच कर्मचाऱ्यांचा फौज फाटा पोलीस बंदोबस्तात कारवाई स्थळी दाखल झाला.
यावेळी अनधिकृत खोकेधारकांची चांगलीच धांदल उडाली. आम्हाला बाजू मांडण्यासाठी वेळ द्यावा. सामान काढून घेतो. नुकसान करू नका अशी भूमिका मांडत कारवाई थांबवण्याची मागणी संबंधित खोकेधारकांनी केली. दरम्यान, अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या पथकाने साधारणतः अर्धा तास वेळ दिला. त्यानंतर पुन्हा पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कारवाई सुरू ठेवली. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या व डाव्या बाजूकडील सुमारे 26 अनधिकृत खोके जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आली. त्यानंतर येथील खोक्यांचे पत्रे व इतर भंगार जप्त करण्यात आले.
कारवाईदरम्यान काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महापालिका व पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गेल्या 40 वर्षापासून हे खोकेधारक तिथे व्यवसाय करीत आहेत. त्यांना अवधी द्यावा अशी सूचना केली. त्यानंतर या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा करतो असे नरोटे यांनी यावेळी सांगितले. त्यांनतर कारवाई अखंडितपणे सुरू ठेवण्यात आली. या कारवाई वेळी मोठी गर्दी झाली होती.
गेल्या 40 वर्षापासून आम्ही येथील खोक्यांमध्ये व्यवसाय करीत आहोत. जिल्हा परिषद प्रशासनाकडून नव्या रचनेचा प्रस्ताव विचाराधिन आहे. तत्पूर्वीच ही कारवाई करण्यात आली. बाजू मांडण्यासाठी वेळ द्यायला हवा होता, अशी भावना अनधिकृत खोकेधारकांनी व्यक्त केली.
पुन्हा आठ दिवसानंतर या ठिकाणी कारवाई
सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या लगतच्या उजव्या व डाव्या बाजूकडील सुमारे 26 अनधिकृत खोकी जेसीबीच्या साह्याने निष्काशीत करण्यात आली. महापालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाची यंत्रणा उपलब्ध करण्यात आली. दरम्यान आठ दिवसानंतर पुन्हा या ठिकाणी उर्वरित कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी दिली.