
डॉ.आंबेडकर उद्यानातील काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप
सुशोभीकरण कामाचे थर्ड पार्टी ऑडीट करण्याची मागणी
उद्यान कृती समितीचे महापालिका उपायुक्तांना निवेदन
सोलापूर : सम्राट चौक जवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात माता रमाई व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा चबुतऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे आणि संथ गतीने होत आहे असा आरोप करत या कामाचे थर्ड पार्टी ऑडीट करण्यात यावे, अशी मागणी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत समितीचे अध्यक्ष कामगार नेते अशोक जानराव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांना निवेदन दिले. सम्राट चौक नजीक न्यू बुधवार पेठ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात माता रमाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा चबुतऱ्याचे काम सुरू आहे तसेच या परिसराचे सुशोभीकरणही करण्यात येत आहे.
या ठिकाणी १०० फुट व्यासाचा एक ॲम्पीथिएटर तयार करण्यात येत असून त्यावर ५० फुट उंचीचा फायबर डोम तयार करण्यात येत आहे.
या सर्व कामासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगरोत्थान योजने अंतर्गत एक कोटी तीस लाख निधी मंजूर आहे. परंतु गेल्या २ वर्षापासून काम अत्यंत धीम्या गतीने केले जात आहे. काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांचा पुतळा बसविण्यासाठी तयार करण्यात आलेला चबुतरा व इतर कामे करण्यासाठी आता पर्यंत ८५ लाख रूपये खर्च झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे चबुतऱ्याचे काम रेंगाळलेले आहे. महापालिकेचे अधिकारी, इंजिनिअर व कन्सलटंट एकमेकावर ही जबाबदारी ढकलत आहेत. या चबुतऱ्याच्या कामाचा दर्जा व गुणवत्ता अतिशय खराब आहे. त्यामुळे या कामात ८५ लाख इतकी मोठी रक्कम निश्चितच अवाजवी लावली असल्याचे दिसून येते. या कामामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार अधिकारी, महापालिका तांत्रिक सत्लागार यांच्या संगनमताने झाल्याचे दिसत आहे. असा आरोप निवेदनात केला आहे. त्यामुळे या कामाचे थर्ड पार्टी ऑडीट करावे, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी केरू जाधव, श्याम शिंगे , नागसेन माने, अण्णासाहेब वाघमारे , चित्तरंजन सातपुते, अनिल जगझाप , भीमराव लोखंडे, रत्नदीप कांबळे, आर. जी. गायकवाड, भारत आवारे आदी उपस्थित होते.