ड्रेनेजच्या घाण पाण्यात बसून केले निषेध आंदोलन
अन्यथा ते घाण पाणी आयुक्तांच्या कार्यालयात टाकण्याचा इशारा !
सोलापूर : भवानी पेठ परिसरातील घरांमध्ये ड्रेनेज तुंबून घाण पाणी जात आहे. त्याचबरोबर हेच घाण पाणी नळाच्या पाण्यात मिसळत आहे. रस्त्यावरही हे तुंबलेले घाण पाणी पसरत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याचा निषेध करत येथील नागरिकांनी रस्त्यावरील या घाण पाण्यात बसून ठिय्या आंदोलन केले.
दाट लोक वस्ती असलेल्या भवानी पेठ परिसरामधील मराठा वस्ती, मुकुंद नगर, राजीव गांधी नगर, जम्मा वस्ती, बसवंती प्लॉट, या ठिकाणी हजारोच्या संख्येने लोक येथे राहतात. वीस वर्षांपूर्वी ड्रेनेज लाईन बदलण्यात आली होती. सार्वजनिक शौचालय करिता साडेआठ लाख रुपये निधी मंजूर झालेला कुठे गेला ? येथील ड्रेनेज लाईन तुंबल्याने स्वयंपाक घरामध्ये, पिण्याच्या पाण्यात घाण पाणी जात आहे. आरोग्यास धोका निर्माण होत आहे. ड्रेनेज तुंबून पसरलेल्या घाण पाण्यात बसून अखेर संतप्त नागरिकांनी निषेध आंदोलन केले.
संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे आयुक्त यांच्याकडे करण्यात आली होती. यावर कोणती कारवाई झाली नाही. हे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे. अन्यथा भवानी पेठ मधील सर्व नागरिकांच्या घरात शिरणारे घाण पाणी आयुक्तांच्या केबिनमध्ये टाकणार असल्याचा इशारा भवानी पेठ येथील सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांच्यासह त्रस्त नागरिकांनी दिला आहे.
——–