
थकबाकीदारांच्या मिळकतींवर एप्रिल, मे मध्ये बोजा चढविणार !
महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांची माहिती
सोलापूर : महापालिका प्रशासनाने मार्च एंड पर्यंत मिळकती सील व नळ बंदची मोहीम राबविल्यानंतर आता एप्रिल आणि मे महिन्यात थकबाकीदारांच्या मिळकतींवर बोजा चढविण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली.
महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकत कर विभागाचे प्रमुख युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली या विभागाच्या नऊ पथकांनी संपूर्ण मार्च महिन्यात थकबाकी वसुली बरोबरच मिळकतींना सील ठोकणे आणि नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम राबविली. सुमारे 20 कोटी रुपये कर मार्चच्या महिनाभरात वसूल झाला मात्र अद्यापही मोठ्या प्रमाणात थकबाकी मिळकतदारांकडे आहे. यामुळे जे मिळकतदार नोटिसा बजावून सूचना करूनही थकीत मिळकत कर भरत नाहीत. मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे अशा थकबाकीदारांच्या मिळकतींवर एप्रिल व मे महिन्यात बोजा चढविण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. सोलापूर शहरातील प्रत्येक पेठ निहाय दहा थकबाकीदारांच्या मिळकतींवर बोजा चढविण्यात येणार आहे.
दरम्यान, निवडणुकीनंतर साधारणतः जून महिन्यात बोजा चढविलेल्या मिळकतींची लिलाव प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने महापालिका प्रशासनाकडून कारवाईची मोहीम अधिक कडक करण्यात येणार असल्याचे यावेळी उपायुक्त आशिष लोकरे यांनी स्पष्ट केले.
सोलापूर शहरातील मिळकतदारांनी मिळकत कराची थकबाकी भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे.
चुकीची नोंद असल्यास दुरुस्ती करून घ्यावी
सोलापूर शहरातील ज्या मिळकतदारांच्या मिळकत कराच्या नोंदी चुकीच्या आढळून आल्या आहेत अशी शंका वाटते, त्या मिळकतदारांनी महापालिका मिळकत कर विभागाकडे रीतसर कागदपत्रासह अर्ज करावेत. चुकीची नोंद असल्यास ती नियमानुसार दुरुस्त करून देण्यात येईल. याची संबंधित मिळकतदारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे.
मे महिन्यात बिले वाटपाचा प्रयत्न
सोलापूर शहरातील सर्व मिळकतदारांना येत्या मे महिन्यात मिळकत कराची बिले वाटप करण्याचा महापालिका मिळकत कर विभागाचा प्रयत्न राहणार आहे. त्यानुसार तशी तयारीही सुरू करण्यात आली आहे, असेही उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितले.