‘पाण्याचा दिवस’ हा कलंक पुसण्यासाठी…!
थाळीनादद्वारे सोलापूरकरांनी पाणी प्रश्नाकडे वेधले लक्ष !
अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा सोलापूर विकास मंचचा इशारा
सोलापूर : ‘पाण्याचा दिवस’ हा सोलापूरला लागलेला कलंक पुसण्यासाठी सोलापूर विकास मंचच्या वतीने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत रविवारी सकाळी १० वाजता काही सोलापूरकरांनी स्वतःच्या घरातुन ५ मिनिटे थाळीनाद करुन शहरातील पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधले.
३६५ दिवसांचा महापालिका कर भरुनही जेमतेम १०० दिवस अवेळी, अनियमित, गढुळ, दुर्गंधीयुक्त दुषित पाणीपुरवठा सोलापूर महानगरपालिका अनेक वर्षांपासून करीत आहे. उजनी धरण उराशी असुनही सोलापूरकरांना हा भोग भोगावा लागतोय. १२३ टिएमसी धरण क्षमता असून प्रती वर्षीं भरते आणि सोलापूर शहरास प्रतिवर्षी जेमतेम केवळ ३ टिएमसी पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असुनही सोलापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे सोलापूरकरांना पुरेसे पाणी मिळू शकत नाही. ‘पाण्याचा दिवस’ म्हणून मरणयातना भोगाव्या लागत आहे, असा आरोप करत मंचने थाळीनाद करण्याचे आवाहन केले होते. त्यास काही ठिकाणी प्रतिसाद मिळाला.
दुहेरी जलवाहिनीमुळे सोलापूरचा पाणीपुरवठा व्यवस्थित होईल. हा एक भ्रम असुन, सोलापूर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचा नियोजनाशुन्य कारभार तथा स्काडा हा संपूर्णपणे फसव्या प्रयोगाच्या निषेधार्थ रविवारी शहरातील विविध ठिकाणी नागरिकांनी थाळीनाद करून पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधले.
सोलापूर विकास मंचचे मिलिंद भोसले, केतन शहा, योगिन गुर्जर, विजय कुंदन जाधव, ऍड.दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षिरसागर, आनंद पाटील यांच्यासह पदाधिकारी व विविध ठिकाणच्या नागरिकांनी थाळीनाद केला. येत्या महिन्याभरात सोलापूरचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सोलापूर विकास मंचच्या वतीने देण्यात आला आहे.
या आठवड्यात महापालिका आयुक्तांसह बैठक
दरम्यान, या आंदोलनाची दखल घेण्यात आली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या स्वीय सहायकांनी या गंभीर प्रश्नासंदर्भात आठवड्यात सोलापूर महापालिका आयुक्तांसह बैठक घेण्यात येणार असल्याचे सोलापूर विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांना कळविले आहे, अशी माहिती मंचचे मिलिंद भोसले यांनी दिली.