
नवी पेठकडील वनवे रस्ता खड्डेमय !
वाहनधारकांना करावी लागत आहे कसरत
या रस्त्याचे भोग कधी संपणार ; संतप्त नागरिकांचा सवाल
सोलापूर : नवी पेठ कडे जाणारा वनवे रस्ता खड्डेमय झाला आहे. अनेक खड्डे असल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याचे भोग कधी संपणार असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकानजीक वेलनेस झोन ते भारत इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत नवी पेठ कडे जाणाऱ्या रस्त्यांवर अनेक खड्डे पडले आहेत. या रोडवरच गुरुनानक शॉपिंग सेंटर आहे. मोठा वर्दळीचा हा रस्ता असल्याने वाहनधारकांना खड्ड्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस होत असल्याने पाणी साचून या खड्ड्याचा अंदाज वाहनधारकांना येत नाही. यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. येथील काही दुकानांच्या समोरच या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचते. ये – जा करण्यासाठीही मोठी अडचण निर्माण होत आहे.
या रस्त्यावर सुरुवातीला दत्त हॉटेलच्या मागील बाजूस या खड्ड्यांचा प्रवास सुरू होतो. त्यानंतर पुढे छोटे-मोठे खड्डे दिसून येतात. पुढे अमर होजिअरी दुकानासमोर वर्षानुवर्षांपासून सकल भाग असल्याने पाणी साचून खड्डे पडले आहेत. यामुळे येथील पूर्ण रस्ताच खड्डेमय झाला आहे. रस्त्याची पुरती चाळण झाली आहे. अनेक वेळा दुचाकीवरून घसरून पडले आहेत. महिला वाहनधारकांना या खड्ड्यामधून जाताना मोठी अडचण निर्माण होते. अनेक वेळा महिला वाहनधारकांचा अपघात झाला आहे.
याच परिसरात वारंवार या ना – त्या कारणाने जलवाहिनीला गळती लागून पाणी सर्वत्र पसरते. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. त्याचबरोबर येथील रस्ताही खराब होतो. महापालिका प्रशासनाने तातडीने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज वर्तवली जात आहे.
आयुक्त म्हणतात खड्डे बुजवले तर
दुसरीकडे हा रस्ताच खड्डेमय
महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी काही दिवसापूर्वी मान्सून पूर्व 90 टक्के कामे झाली आहेत. त्या अंतर्गतच शहरातील विविध रस्त्यांवरील खड्डेही बुजवण्यात आले असल्याचे स्पष्ट केले होते मात्र दुसरीकडे हा रस्ताच खड्डेमय झाला असल्याचे दिसून येते. यामुळे अधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांची दिशाभूल केली असल्याचा आरोप होत आहे. महापालिका आयुक्तांनी या संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी होत आहे.