फुटपाथवर विक्रेत्यांना मनाई केल्याने चैतन्य मार्केट गजबजले

फुटपाथवर विक्रेत्यांना मनाई केल्याने चैतन्य मार्केट गजबजले

विजापूर रोडवर बसलं की केली जाते भाजी, फळ विक्रेत्यांवर कारवाई 

सायंकाळी ५ ते  ७ वेळेत अतिक्रमण प्रतिबंधक, मंडई विभागाचे पथक तळ ठोकून 

सोलापूर  : विजापूर रोडवरील फुटपाथवर तसेच रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे भाजी व फळ विक्री करणाऱ्यांवर नियमित कारवाई होत असल्याने शेजारील चैतन्य मार्केट गजबजले आहे. महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभाग आणि मंडई विभागाचे संयुक्त पथक रोज  सायंकाळी ५ ते ७ या वेळेत या परिसरात तळ ठोकून आहे. परिणामी या परिसरातील फुटपाथने मोकळा श्वास घेतल्याचे दिसून येत आहे. 

           सोलापूर शहरातील वर्दळीचा मार्ग असलेल्या विजापूर रोडवर रस्त्याच्या कडेला आणि फुटपाथवर फळ व भाजी विक्रेते अतिक्रमण करून व्यवसाय थाटतात. यामुळे रहदारीस अडथळा येऊन अपघाताच्या घटना घडल्या आहेत. विशेष करून सायंकाळी ऑफिस सुटल्यानंतर अनेक नोकरदार, चाकरमानी मंडळी हे फुटपाथवर अतिक्रमण करून बसलेल्या  विक्रेत्यांकडून भाजी व फळ

 खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते. त्यावर उपाययोजना म्हणून महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभाग आणि मंडई विभागाच्या संयुक्त पथकाकडून विजापूर रोडवर सायंकाळी पाच ते सात या वेळेस अनधिकृत फळ व भाजी विक्रेत्यांवर दररोज  कारवाई करण्यात येत आहे. सायंकाळी या वेळेत महापालिकेचे पथक तळ ठोकून तैनात असते. फुटपाथ वर रस्त्याच्या कडेला अनधिकृत पणे विक्रेते बसले की जप्तीची कारवाई  केली जात आहे. 

        महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक आणि मंडई विभागाच्या हे संयुक्त पथक विजापूर रोडवर तळ ठोकून  गस्त घालत असल्याने अनधिकृत भाजी व फळ विक्रेत्यांना  नाइलाजस्तव आता शेजारील चैतन्य मार्केटमध्ये बसण्याशिवाय पर्याय राहिला नाही. यामुळे चैतन्य मार्केट गजबजल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या दररोजच्या नियमित कारवाई मोहिमेमुळे विजापूर रोड आणि फुटपाथने मोकळा श्वास घेतला असल्याचे पाहायला मिळाले. 

       आज सोमवारी नियमितपणे या रोडवर ही मोहीम राबविण्यात आली. विजापूर रोडवर यादरम्यान फुटपाथवर अनधिकृत विक्रेते दिसून आले नाहीत. यावेळी अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रभारी प्रमुख मुर्तूज  शहापुरे , कनिष्ठ अभियंता सुफीयत पठाण, मंडई विभागाचे के. ए. कट्टीमनी यांच्यासह कर्मचाऱ्यांचे पथक तैनात होते.

 पोलीस बंदोबस्तासह 

सुमारे 16 कर्मचारी तैनात

विजापूर रोडवरील फुटपाथ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे आठ आणि महापालिका मंडई विभागाचे आठ कर्मचारी रोज सायंकाळी पाच ते सात या वेळेत तैनात ठेवले जातात. महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रभारी प्रमुख  मुर्तूज  शहापुरे आणि मंडई विभागाचे प्रभारी प्रमुख नागनाथ बिराजदार यांच्या माध्यमातून पोलीस बंदोबस्तात पथकाच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *