बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरणी विभागीय चौकशी सुरूच !

बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरणी विभागीय चौकशी सुरूच !

आता चौकशी अहवालाची प्रतीक्षा ; कारवाईकडे लक्ष !

 तत्कालीन झोन अधिकारी नाईकवाडी, अवेक्षक खानापुरे यांच्यासह चौघे चौकशीच्या फेऱ्यात !

सोलापूर :  महापालिका नगररचना विभागाकडे कार्यरत नसताना नगर रचना विभागाला डावलून बांधकाम परवानग्या देण्याची चक्क समांतर बेकायदेशीर व्यवस्था निर्माण केल्याच्या धक्कादायक प्रकरणी 

चौघांची विभागीय चौकशी सुरु आहे. 

आता चौकशी अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, अहवाल सादर केल्यानंतर याप्रकरणी नेमकी काय कारवाई होणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

            सोलापूर महापालिकेच्या प्रतिमा मलिन करणाऱ्या या गंभीर प्रकरणामुळे महापालिका वर्तुळासह शहरात एकच खळबळ उडाली होती. सिनेमालाही लाजवेल अशा प्रकारे ही काळी समांतर यंत्रणा राजरोसपणे कार्यरत होती. हा गंभीर प्रकार चालू असताना वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासन गाफील राहिले. ही गंभीर आणि अनाकलनीय बाब आहे. एका तक्रारदारामुळे हा प्रकार उघडकीस आला होता. सध्या  चौकशी अधिकारी के. पी. देशमुख यांच्याकडून या गंभीर प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

        या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देत महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी याप्रकरणी महापालिकेचे तत्कालीन सहाय्यक अभियंता तथा विभागीय अधिकारी (झोन क्रमांक – 8) झेड.ए. नाईकवाडी , तत्कालीन अवेक्षक श्रीकांत बसण्णा खानापुरे (नगररचना डीपी युनिट), नगर अभियंता कार्यालयातील तत्कालीन अवेक्षक शिवशंकर बळवंत घाटे आणि  कामगार कल्याण जनसंपर्क कार्यालयातील तत्कालीन वरिष्ठ श्रेणी लिपिक आनंद वसंत क्षीरसागर या चौघा जणांवर निलंबनाची कारवाई केली होती. 

     दरम्यान, याप्रकरणी या चौघांना अनुक्रमे चार  नोटिसा बजावण्यात आल्या. त्यानंतर त्यांनी 90 दिवसांत नोटीसना उत्तर दिले. आरोप मान्य केला नाही. त्यामुळे याप्रकरणी आता विभागीय चौकशी करण्यात येत आहे. चौकशी अधिकारी म्हणून के. पी. देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका बांधकाम विभागाच्या उपअभियंता सारिका आकुलवार या पत्र सादरकर्त्या आहेत. याप्रकरणी चौकशी सुरूच आहे.

       नगररचना विभागाकडे कार्यरत नसताना, बांधकाम परवान्याबाबतचे कोणतेही कामकाज हाताळण्याचे अधिकार नसताना बिपीएमएस प्रणालीद्वारे प्रकरणे निकाली काढण्याची यंत्रणा कार्यान्वीत असतानासुद्धा तिचा अवलंब न करता ऑफलाईन पद्धतीने बांधकाम परवानगी दिल्या तसेच नगर रचना विभागाला डावलून बांधकाम परवानग्या देण्याची समांतर बेकायदेशीर व्यवस्था निर्माण केली. हे अधिकारी व कर्मचारी नगर रचना विभागाच्या बांधकाम परवाना विभागाकडे कार्यरत नसताना बांधकाम परवाना देणे, नियमाचे उल्लंघन करणे, ऑनलाईन पद्धतीने कामकाज चालू असताना, ऑफलाईन पद्धतीने बांधकाम परवानगी देणे असे अनेक मुद्दे उपस्थित करून तसेच ज्यांना बांधकाम परवाना देण्यात आलेला आहे. त्यांची नावे नमुद करून तुकाराम राठोड यांनी दि. १९ एप्रिल २०२३ रोजी तक्रार अर्ज केला होता. राठोड यांनी माहिती अधिकाराअंतर्गत चार बांधकाम परवानगीचे कागदपत्रे मिळण्याबाबत दि. १९ एप्रिल २०२३ रोजी अर्ज केला होता.

       बांधकाम परवानगीची एक प्रत कर आकारणी विभागास देण्यात येत असते ती प्रत उपलब्ध करून घेण्यासाठी मालमत्ता कर विभागाकडे पत्र व्यवहार केला असता सदर विभागाकडेही बांधकाम परवानगीची प्रत पाठविली नसल्याचे निदर्शनास आले होते. त्याबाबतची कोणतीही कागदपत्रे नगर रचना विभागाच्या अभिलेख्यात व अन्य कार्यालयाकडेही उपलब्ध होऊ शकलेली नाहीत. तक्रारीत तत्थ्य असल्याचे सकृतदर्शनी दिसून आले. 

कार्यालयात नस्ती सापडल्या नाहीत

त्यानुसार कागदपत्रे देणेकामी बांधकाम विभागाकडील अभिलेख्यात चार फाईलचा शोध घेतला असता, कार्यालयात नस्ती सापडल्या नाहीत. कार्यालयात नस्ती उपलब्ध न झाल्याने संबंधीत बांधकामधारकांकडे याबाबत चौकशी केली. तर या चार पैकी दोन प्रकरणातील बांधकाम परवाना प्रमाणपत्र व नकाशा उपलब्ध झाले होते. त्यापैकी एका नकाशावर श्रीकांत खानापूरे यांची स्वाक्षरी दिसून आली. यास्तव संबंधित बांधकाम धारकाला त्यांच्या जागेची सर्व कागदपत्रे, बांधकाम परवानगी, मंजुर नकाशे देण्याबाबत व सुरू असलेले बांधकाम त्वरीत थांबविणेबाबत पत्र देण्यात आले.तेव्हा त्यापैकी बरीच पत्रे पत्ता अपूर्ण असल्याने परत आली होती.

 7 जुलै रोजी केले होते चौघांना निलंबित 

नगर रचना विभागाला डावलून बांधकाम परवानग्या देण्याची समांतर बेकायदेशीर व्यवस्था या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी निर्माण केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट झाले. या चौघांच्या गैरवर्तनासाठी अधिक चौकशी करणे गरजेचे आहे. या चौकशीस बाधा येऊ नये म्हणून या चौघांना निलंबनाधिन ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे या चौघा अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिनांक 7 जुलै 2023 रोजी कार्यालयीन वेळेनंतर सेवेतून निलंबन कारवाई महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांनी केली होती.

चौकशीअंती खरे चित्र स्पष्ट होणार ! 

याप्रकरणी चौकशी अधिकारी के. पी. देशमुख हे चौकशीचे काम पूर्ण करणार आहेत. या संबंधित अधिकाऱ्यांनी आणखी किती बांधकाम परवाने दिले आहेत. नेमकं काय काय या गंभीर प्रकरणात दडले आहे ? त्याचे चित्र मात्र चौकशीअंती स्पष्ट होणार आहे. अहवालाची प्रतीक्षा आहे. याकडे आता सर्व शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *