
बौद्ध धम्माचा प्रचार – प्रसार करणे सर्वांची जबाबदारी
श्रीलंका येथील भंते सुमनरत्न यांचे सोलापुरात आवाहन
सोलापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे भारतात बौद्ध धम्माचे पुनर्जीवन झाले. धम्म वाढला. डॉ. आंबेडकर यांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न साकारण्यासाठी धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे आवाहन श्रीलंका येथील भंते सुमनरत्न यांनी सोलापुरात केले.
तथागत गौतम बुद्ध , भंते सारिपुत्त, भंते महामोग्लायन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अस्थि कलश दर्शन यात्रा सोलापुरात आली असताना डॉ. आंबेडकर उद्यान येथे आयोजित धम्म प्रवचनात ते बोलत होते. यावेळी भंते बी. सारिपुत्त आणि भिक्षुणी धम्मचारीणी , भिक्षुणी खेमा महाथेरो, भिक्षुणी संघमित्रा यांची मंगलमय उपस्थिती होती.
तसेच इंडो एशियन मेत्ता फाउंडेशन इंडियाचे प्रमुख नितीन गजभिये (नागपूर), आयोजक स्मिता वाकडे, सत्यजित जानराव आदींसह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या धम्म प्रवचनात भंते सुमनरत्न पुढे म्हणाले, आम्ही श्रीलंकेतील लोक तथागत गौतम बुद्धांचा धम्म जिवापाड मानतो. त्याचे आचरणही करतो. भारतात विश्वरत्न डॉ. आंबेडकर यांच्यामुळे बौद्ध धर्माचे पुनर्जीवन झाले. डॉ. आंबेडकर यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये बौद्ध धम्माची रुजवात केली. भारत बौद्धमय करण्याचा संदेश त्यांनी दिला होता. डॉ. आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्याचे आज सर्वांचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही यात्रा काढण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
याप्रसंगी भंते सुमनरत्न यांनी बौद्ध धम्मातील शील, नैतिकता आणि आचरण यावर भाष्य केले. लोकांनी अंधश्रद्धा झटकून टाकली पाहिजे. धम्म शिकवणीप्रमाणे आचरण करण्याची गरज आहे. धम्म वाढीसाठी सर्वांनी तन-मन-धनाने पुढे आले पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन निमंत्रक अण्णासाहेब वाघमारे यांनी केले. याप्रसंगी समितीचे निमंत्रक धम्मरक्षिता कांबळे , नागसेन माने, कामगार नेते अशोक जानराव, केरू जाधव, सुभानजी बनसोडे,
डॉ. सुरेश कोरे, डॉ. ज्योत्स्ना कोरे , शारदा गजभिये, निर्मला कांबळे, मीनाक्षी बनसोडे, प्रा. संघप्रकाश दुड्डे , विनोद इंगळे, श्याम शिंगे, शेखर शिवशरण, जनार्दन मोरे, सचिन गायकवाड आदींसह विविध समित्यांचे पदाधिकारी, उपासक – उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, रविवारी सकाळीही डॉ. आंबेडकर उद्यान येथे अस्थिकलशाचे अनेकांनी दर्शन घेतले. त्यानंतर ही अस्थि कलश यात्रा तुळजापूर (धाराशिव) कडे मार्गस्थ झाली.