मंगळवेढ्यात भिमा नदी कोरडी पडल्याने बागयती क्षेत्र सापडले संकटात !

मंगळवेढा तालुक्यातून वाहणारी भिमा नदी पाण्याअभावी कोरडी ठणठणीत पडल्याने नदीकाठावरील गावचा पाण्याचा व बागायत शेतीचा प्रश्‍न गंभीर बनल्याने भविष्यात घशाची तहान कशी भागवायची? या प्रश्‍नाने नागरिक व शेतकरी गंभीर बनले आहेत.

यंदाच्या पावसाळी हंगामात जून ते सप्टेंबर मध्ये पावसाची नक्षत्रे कोरडी गेल्याने जिल्ह्याचे उजनी धरण भरू शकले नाही. मागील दहा वर्षाचा इतिहास पाहता अशी परिस्थिती निर्माण झाली नसल्याचे जाणकारामधून सांगण्यात येत आहे. यंदा केवळ उजनी धरण 55 टक्के भरल्याने जिल्ह्यावर पाणी टंचाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे. सध्या धरणामध्ये केवळ 13 टक्के पाणीसाठा असून जून पर्यंत हे पाणी पिण्यासाठी राखीव असल्याने या पाण्याची पळवापळवी होवू नये अशा प्रतिक्रिया नागरिकामधून व्यक्त होत आहेत.

सध्या भिमा नदी पाण्याअभावी कोरडी ठणठणीत असून कुठेतरी एखाद्या खड्डयामध्ये साचलेल्या पाण्यावर बळीराजा आपल्या पिकाला जीवदान देण्याचा विशेष प्रयत्न करीत आहेत. भविष्यात येणारा उन्हाळा अत्यंत कडक असल्याने सांगण्यात येत असल्याने ऊसासारख्या पिकाचे काय होणार? या विवंचनेने शेतकरी वर्ग ग्रासला आहे. काही शेतकर्‍यांनी नुकतेच महाराष्ट्र बँकेकडून कर्ज काढून मोठया आशेने बागायतीचे स्वप्ने रंगवीत दूरवर पाईपलाईन केली आहे. मात्र नदीत पाणी नसल्यामुळे बागायत अभावी शेती जैसे थे स्थितीत आहे.

पाईपलाईनसाठी उचलेल्या कर्जाचा घोडा मात्र मोठा होणार असल्याने याचा फटका दुष्काळात या शेतकर्‍यांना बसणार आहे. भिमा नदी काठावर हजारो हेक्टर दहा ते पंधरा कि.मी.अंतरापर्यंत बागायती क्षेत्र आहे. या क्षेत्रातील ऊसासारखी पिके तुटून कारखान्याला गेले आहेत. मात्र ऊस जगवण्यासाठी पाणी नसल्याने काही शेतकर्‍यांनी ऊस मोडून टाकण्याचा निर्णयही घेतला असून पुढील वर्षी गाळप हंगामात ऊसाची टंचाई भासणार असल्याने भाकीत शेतकरी वर्गातून केले जात आहे. स्वतःच्या लहान मुलाप्रमाणे शेतकर्‍यांनी ऊस पिके सांभाळून जगवली असताना अचानक निसर्गाने दिलेला फटका हा शेतकर्‍यांचे आर्थिक कंबरडे मोडणारा ठरत आहे. कमी पावसामुळे तालुक्याच्या दक्षिण भागातील विहिरी पाण्याअभावी कोरडया ठणठणीत पडल्या आहेत. वाडीवस्तीवरील राहणार्‍या लोकांना पाण्यासाठी वणवण फिरून शोधून सायकल, मोटारसायकल यांचा आधार घेवून पाणी आणावे लागत असल्याचे चित्र आहे.

वाडयावस्त्यावरून टँकरने पाणी पुरवठा शासन करेल मात्र पाणी टंचाईमुळे जनावरांना पाणी कोठून आणायचे? असा पशुपालकांना पडलेला प्रश्‍न आहे.
फोटो ओळी- ब्रह्मपुरी येथे भिमा नदीचे पात्र पाण्याअभावी कोरडे पडल्याचे छायाचित्रात दिसत आहे. (छाया ः शिवाजी पुजारी,मंगळवेढा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *