महापालिका कर्मचाऱ्यांच्या मेडिक्लेम संदर्भात शासनाचे मार्गदर्शन अप्राप्त
कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ घ्यावा
आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांची माहिती
सोलापूर : महापालिका कर्मचाऱ्यांच्या मेडिक्लेम कॅशलेस सुविधाबाबत शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाले नाही. त्यामुळे या संदर्भात अद्याप महापालिका प्रशासनाने निर्णय घेतला नाही. मात्र कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ देणे सुरूच आहे, अशी माहिती प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी दिली.
महापालिका कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम
कॅशलेस सुविधा योजनेचा लाभ मिळवून देण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडून काय हालचाली सुरू आहेत ? या संदर्भात विचारले असता महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. महापालिका कर्मचाऱ्यांना लागू असलेली पूर्वीची मेडिक्लेम योजना सध्या बंद आहे. त्याऐवजी आता आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याचे शासनाचे आदेश आहेत मात्र कर्मचाऱ्यांकडे पांढरे रेशन कार्ड असल्यामुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे मेडिक्लेम योजने संदर्भात महापालिका प्रशासनाने शासनाकडे मार्गदर्शन मागविले आहे. ते मार्गदर्शन अद्याप प्राप्त झाले नाही. त्यानंतरच आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. मात्र महापालिका प्रशासनाकडून वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ देण्यात येत आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलचा खर्च अगोदर अदा करून त्यानंतर झालेल्या बिलाची प्रतिपूर्ती महापालिकेकडून घ्यावयाची आहे. बायपास सर्जरीसह इतर उपचारावरील खर्चाची प्रतिपूर्ती मिळू शकते, असे महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान , सोलापूर महानगरपालिकेच्या विविध खात्याकडील कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती ही नाजूक असल्याने येणारा खर्च त्याना परवडणार नसल्याने सोलापूर महापालिकेकडील कर्मचाऱ्यांसाठी मेडिक्लेम विमा काढण्यात आला आला होता.
दि. 30 जुलै 2021 रोजी मेडिक्लेम विमा
स्मार्ट कार्ड देण्यात आले. काही महिनेच महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला मात्र दरम्यानच्या काळात शासनाने नियम बदलला. कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू केली. या नव्या योजनेअंतर्गत कर्मचारी व कुटुंबीयांना पाच लाख पर्यंतचे उपचार देण्यात येतात. परंतु महापालिका कर्मचाऱ्यांकडे पांढरे रेशन कार्ड असल्याने या योजनेचा लाभ घेण्यात अडचणी आहेत. परिणामी महापालिका कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी खर्च परवडत नसल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शस्त्रक्रियासह इतर उपचार घेणे अडचणीचे ठरत आहे. कर्ज काढून उपचार घ्यावे लागत आहेत. गंभीर बाब म्हणजे, सोलापूर शहरातील काही खाजगी रुग्णालयात आयुष्यमान योजना लागू नसल्याचे सांगण्यात येते. यामुळे प्रचंड अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी महापालिका कर्मचारी व कर्मचारी कुटुंबीयांना पुण्या – मुंबईला शस्त्रक्रियेसाठी जावे लागत आहे. प्रतीपूर्तीची रक्कम मिळत असली तरी तेवढा मोठा खर्च सुरुवातीला भरणे कर्मचाऱ्यांसाठी अवघड आहे. महापालिका कर्मचारी संघटनांच्या वतीने तत्काळ मेडिक्लेम योजना लागू करण्याची मागणी केली जात आहे.
मेडिक्लेम योजनेपासून
4 हजार 570 कर्मचारी वंचित
सोलापूर महापालिकेतील एकूण 4 हजार 570 कर्मचाऱ्यांसह कुटुंबातील 16 हजार 666 व्यक्तींना मेडिक्लेम योजनेचा लाभ मिळत होता. जुलै 2021 मध्ये कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले होते. महापालिकेमधील पदाधिकारी, नगरसेवक तसेच आस्थापना वरील कर्मचारी, मानधनावरील कर्मचारी, रोजंदारी कर्मचारी, बदली कर्मचारी यांचा मेडिक्लेम विमा उतरविण्यात आला होता. त्या कर्मचारी बरोबर कुटुंबातील आई – वडील, पती – पत्नी व पंचवीस वर्षाखालील दोन अविवाहित अपत्य अशांचा समावेश करण्यात आला होता. मात्र या योजनेपासून ते वंचित आहेत.