
महापालिका कर्मचाऱ्यांच्या योग शिबिरास प्रारंभ
कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्तपणे चांगला प्रतिसाद
सोलापूर : महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी दि 16 ते 22 मे 2024 दरम्यान रोज पहाटे 5.30 वाजता महापालिका आवारात आयोजित योग शिबीरास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यास कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
कामाच्या घाई गडबडीत महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी सोलापूर महापालिका आवारात गुरुवारपासून योग शिबीरास सुरुवात करण्यात आली. उपायुक्त आशिष लोकरे यांच्या संकल्पनेतून हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यास कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. सोलापूर जिल्हा योग परिषदेच्या प्रशिक्षक स्नेहल पेंडसे यांच्यासह सहकाऱ्यांनी योगाचे धडे दिले. त्याचबरोबर निरोगी आरोग्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले. या शिबिरास उपायुक्त आशिष लोकरे, महापालिका मिळकतकर विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले असेल तर त्यांच्याकडून चांगले काम होऊ शकते आणि त्यासाठीच या कर्मचाऱ्यांसाठी हे योग शिबिर घेतले जात असल्याचेही यावेळी उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितले.