
आगीत कच्चा माल जळाला ; जीवितहानी झाली नाही
सोलापूर : शहरातील माधवनगर येथील एका डब्लिंग कारखान्याला सोमवारी लागलेल्या आगीत कच्चा माल जळाला. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
माधवनगर येथे देविदास विडप यांचा यंत्रमाग व डब्लिंगचा एकत्रित कारखाना आहे. या कारखान्यास सोमवारी सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यावेळी कारखाना सुरू होता. पाहता पाहता आग वाढतच गेली. आग लागताच तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन बंब इतक्या पाण्याचा मारा करून आग विझवली. या आगीत प्रामुख्याने कच्चामाल जळाला. आग लागताच कारखान्यातील कामगार व परिसरातील लोकांनी कारखान्यातील माल बाहेर काढला. आगीमुळे जीवितहानी झाली नाही. नुकसानीचा आकडा समजू शकला नाही.