
मिळकत कर वसुलीसाठी महापालिकेकडून
आता थकबाकीदारांच्या घरासमोर हलगी नाद !
सोलापूर : शहर आणि हद्दवाढ भागातील मिळकत कर थकबाकीदारांच्या घरासमोर हलगी नाद करून त्यांच्याकडून थकीत कराची वसुली केली जाणार आहे.
सोलापूर शहर आणि हद्दवाढ भागातील अद्यापही शेकडो मिळकतदारांचे कोट्यावधी रुपयांचा कर थकीत असल्याने याच्या वसुलीसाठी विशेष पथके तैनात करण्यात आली. या पथकांकडून कारवाईची मोहीम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे तरीही लाखावरील थकीत असलेल्या अनेक मिळकतदार पुढे येत नसल्याने आता यापुढे अशा थकबाकीदारांच्या घरासमोर हलगी नाद करून त्यांच्याकडून थकीत कराची वसुली केली जाणार आहे.
महापालिकेच्या मिळकत कराची शहर हद्दवाढ भागातील सुमारे अडीच लाख मिळकतदारांमधील अद्यापही हजारो मिळकतदारांनी आपल्या कराची रक्कम महापालिकेकडे भरणा केलेली नाही. शिवाय अनेक मिळकतदारांकडे मागील मोठी थकबाकी देखील आहे. यानुसार चालू आर्थिक वर्षातील आणि जुनी थकीत अशी ७४३ कोटींचा कर जमा करण्याचे आव्हानच मालमत्ता कर संकलन विभागासमोर होते. यापूर्वी विभागाने दरवर्षीप्रमाणे तत्पर भरणा वर दिलेल्या पाच टक्के सूट यामधून कराची रक्कम जमा केली. तर यानंतर थकबाकी वसुलीसाठी यापूर्वीच्या थकित करा वरील शास्ती दंड नोटीस फी आणि वॉरंट फी माफीची अभय योजना जाहीर केली होती यामध्येही सुमारे १०० कोटींवर कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला. यानंतर विभागाकडून वसुली आणि जप्ती व नळजोड तोडण्याची कारवाई युद्ध पातळीवर सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान , यापुढील आठ दिवसांत थकबाकीदारांच्या दारासमोर हलगी वाजविण्यात येणार आहे. ऐवढे होऊनही थकबाकी न भरणाऱ्यांच्या मिळकतींवर बोजा चढवून टप्प्याटप्प्याने कठोर कारवाई करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून मार्च महिन्यात १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे उद्दिष्ट होते. पण २५ मार्चपर्यंत १० कोटी रुपयांची देखील वसूली झाली नसल्याने महापालिका प्रशासन आता कडक कारवाई करणार आहे. मिळकत कराची थकबाकी भरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
५० चौकांमध्ये डिजिटल फलकांवर थकबाकीदारांच्या नावाची यादी
थकीत रक्कम भरण्यासाठी थकबाकी मिळकतदार पुढे येत नसल्याने आता प्रशासनाने कारवाईचा नवा फंडा सुरू केला आहे. याचाच भाग म्हणून आता महापालिकेच्या वतीने मिळकत कर थकीत असलेल्यांची नावे शहरातील ५० चौकांमध्ये डिजिटल फलकांवर लावली आहे. १ लाख रुपये किंवा अधिक थकबाकी असणाऱ्यांची ही नावे आहेत.