वंचित बहुजन आघाडीचे रॅलीद्वारे जोरदार शक्ती प्रदर्शन
सोलापुरातून राहुल गायकवाड तर माढ्यातून रमेश बारसकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल
सोलापूर : रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन करत वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर व माढा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. सोलापुरातून राहुल गायकवाड तर माढ्यातून रमेश बारसकर यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला.
वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर राखीव मतदारसंघातील उमेदवार राहुल गायकवाड आणि माढा मतदारसंघातील उमेदवार रमेश बारसकर यांनी आज सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. मिलिंद नगर येथील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार प्रेरणाभूमी येथे दर्शन घेतले. त्यानंतर पुढे ही रॅली सरस्वती चौक, चार हुतात्मा पुतळा चौक, डॉ. आंबेडकर चौक येथे डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅली दरम्यान महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.डोक्यावर टोपी, गळ्यात उपरणे घालून कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. “वंचित बहुजन आघाडीचा विजय असो” या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
त्यानंतर जिल्हा निवडणूक कार्यालय येथे दोन्ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
या रॅलीत वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राहुल गायकवाड आणि माढा मतदार संघातील उमेदवार रमेश बारसकर, शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, महासचिव विनोद इंगळे, शहर उपाध्यक्ष विजयानंद उघडे, विजय गायकवाड, निलेश गायकवाड, राजरत्न फडतरे, उत्तम गायकवाड, नाना कदम, विक्रांत गायकवाड, बबन शिंदे, अझरुद्दीन शेख , विनोद जाधव, माढा विभाग अध्यक्ष राहुल चव्हाण, विशाल नवगिरे , सायबण्णा वाघमारे , प्रदीप सोनटक्के, लालासाहेब मुलाणी, महादेव साबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.