
उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर शहरात महापालिका आरोग्य विभाग सज्ज
नागरिकांनी दुपारी तीव्र उन्हात फिरु नये
सोलापूर : आताच मार्च अखेर शहरातील तापमान ४३ अंश पार झाले आहे. त्यामुळे उष्माघाताचा लोकांना त्रास होऊ नये यासाठी महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाने शहरातील सर्व महापालिका रुग्णालय आणि सर्व आरोग्य केंद्रे येथे उष्माघात रुग्ण आल्यास त्याच्यावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू केले आहेत.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कडाक्याच्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा ४५ अंशा पर्यंत पोहचतो. आताच मार्च अखेर शहरातील तापमान ४३ अंश पार झाले आहे. त्यामुळे उष्माघाताचा लोकांना त्रास होऊ नये यासाठी महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाने शहरातील सर्व महापालिका रुग्णालय आणि सर्व आरोग्य केंद्रे येथे उष्माघात रुग्ण आल्यास त्याच्यावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू केले आहेत. प्रत्येक कक्षात लागणाऱ्या प्राथमिक गरजेची पूर्तता करण्यात आली आहे.
सोलापूर शहरात कडक उन्हाळा सुरु असून, दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे उन्हात फिरणाऱ्या व्यक्तींला उष्माघात होण्याची शक्यता असल्याने महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. महापालिकेतील सर्व हॉस्पिटल देखील रुग्णांसाठी सज्ज असल्याची माहिती महापालिका प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी दिली.
नागरिकांनी दुपारी १२ ते ३ या वेळेतील तीव्र उन्हात फिरु नये तसेच नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
शहरात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात असून दिवसभरात विविध शिफ्टमध्ये कामगार काम करत असतात. यासाठी सकाळपासूनच कामगार आणि विविध कामांसाठी बाहेर पडत असतात. त्यामुळे त्यांना उष्मघाताचा फटका बसण्याची सर्वाधिक शक्यता असते. अशा रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत. यासाठी आरोग्य विभागाने शहरातील सर्व आरोग्य केंद्रे, महापालिका रुग्णालये येथे स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू केले असून याची उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.
आरोग्य केंद्रातील उष्माघात
कक्षात सर्व सुविधा उपलब्ध
आरोग्य केंद्रात उष्माघात कक्षात रुग्णांसाठी बेड, कुलर, थंड पाण्याची व्यवस्था, फॅन या सह औषधोपचारासाठी आवश्यक असलेली सर्व सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच वाढत्या उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या आजारांसह होणारे दुष्परिणामाबाबत जनजागृतीही करण्यात येत आहे, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.