शहरातील नाले सफाईची कामे 81 टक्के  पूर्ण 

 31 मे पर्यंत मान्सूनपूर्व सर्व कामे पूर्ण करा 

  मान्सूनपूर्व कामांच्या आढावा बैठकीत

महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांचे आदेश 

 सोलापूर :  मान्सूनपूर्व सर्व कामे  31 मेच्या आत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांनी सर्व अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत दिले आहेत.

         महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी मान्सूनपूर्व कामांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. महापालिकेचे एक ते आठ विभागीय कार्यालय, मुख्य कार्यालय तसेच नगर अभियंता, पाणीपुरवठा विभाग,उद्यान विभाग, आरोग्य विभाग, अग्निशामन विभाग, आपत्कालीन विभाग आदी विभागाचा यावेळी आढावा घेतला. सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना 31 मे 2024 पर्यंत मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त शितल तेली- उगले यांनी दिले. 

        सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व  कामे सुरू असून सोलापूर शहराचे एकूण क्षेत्रफळ 178 चौरस किलोमीटर असून त्यामध्ये 42 किलोमीटरचे उघडे नाले आहेत. तसेच वेगवेगळ्या डायमीटरचे 217 किलोमीटरचे ड्रेनेज लाईन आहे. याशिवाय

संपूर्ण शहरामध्ये 25 हजार 500 इतके मॅनहोल आहेत. आतापर्यंत मान्सूनपूर्व नालेसफाईचे 81 टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे.

          पावसाळ्याच्या कालावधीत शहरातील विविध भागातील वादळी वाऱ्यामुळे झाडे उमळून पडणे, धोकादायक फांद्या पडणे अशा घटना घडतात अशा घटना होऊ नये म्हणून त्यासाठी उद्यान विभागाला सतर्क राहण्याचे आदेश दिले. सोलापूर शहरातील रस्त्यावरील सर्व खड्डे मान्सूनपूर्व प्रिमिक्सने खड्डे भरून  बुजवण्यात आले आहे. तसेच  राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत (N-CAP) मधून सोलापूर महानगरपालिकेने आतापर्यंत 40 रस्ते गेल्या दोन वर्षात तयार करण्यात आलेले आहेत.त्यामुळे शहरातील खड्ड्यांचे प्रमाणही कमी झाले आहेत. तरीही पावसाळ्याच्या कालावधीमध्ये ज्या रस्त्यांवर खड्डे पडतात त्या ठिकाणी मुरूम भरून बुजवण्यात येणार आहे.

         महापालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व काळात लागणारी सर्व साहित्य खरेदी करण्यात आली आहे.सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व काळामध्ये कोणतेही जीवितहनी व वित्त हनी होऊ नये म्हणून  सर्व कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या आपत्कालीन आराखडा 2023-24 अपडेट आराखडा पूर्ण तयार करण्यात आले असून सोलापूर महानगरपालिकेच्या वेबसाईटवर नागरिकांना माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांनी सांगितले.

          यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त तैमुर मुलाणी, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, संचालक नगररचना मनीष भीष्णूकर, नगर अभियंता सारिका आकुलवार, सार्वजनिक आरोग्य कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे, विद्युत कार्यकारी अभियंता राजेश परदेशी, आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांच्यासह सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते.

15 पैकी धोकादायक 

 7 इमारतीचे केले पाडकाम

         सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने

 शहरातील जुन्या धोकादायक इमारतीचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आल्या असून त्यामध्ये सी -1 श्रेणीमधील अति धोकादायक इमारत आहेत.  15 इमारत पैकी 7 इमारत पाडकाम संबंधित मालकांकडून करण्यात आलेले आहेत.उर्वरित इमारतीचे पाडकाम लवकरच पूर्ण करण्यात येईल.ज्या इमारती अति धोकादायक आहेत अशा इमारतीच्या दर्शनी भागावर महानगरपालिकेच्या वतीने “धोकादायक इमारत आहे” असे बोर्ड लावण्यात येतील, असे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.

आपत्कालीन सेवेसाठी टोल फ्री

 संपर्क क्रमांक असा 18002331916 

सोलापूर महापालिकेचा आपत्कालीन विभाग  24 तास कार्यान्वित असून या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. शहरातील आपत्कालीन विभागाशी संपर्क साधण्यासाठी सोलापूर महापालिकेच्या वतीने टोल फ्री क्रमांक –18002331916 आणि महापालिका नगर अभियंता भांडार – 0217-2740335 उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *