शहरातील फुटपाथ अतिक्रमण मुक्त करणार

भाजी विक्रेत्यांवर होणार कारवाई ; प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करणार

निर्मिती विहार येथील अतिक्रमण हटविले !

सोलापूर : नियमितपणे कारवाई करून सुद्धा सोलापूर शहरात विविध फुटपाथवर अतिक्रमण करण्यात येते. या संदर्भात तक्रारीचा सूर आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसात शहरातील फुटपात अतिक्रमण मुक्त करणार आहेत. मार्केटमध्ये ओटे असतानाही रस्त्यावर रहदारीस अडथळा करून भाजी विक्री करणाऱ्या विरोधात कारवाईची मोहीम हाती घेण्यात येत असून प्रसंगी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी दिला आहे.

          सोलापूर शहरात विविध ठिकाणी फुटपाथवर अतिक्रमण करून विविध वस्तू विक्री होत आहेत त्याचबरोबर काही परिसरात भाजी विक्रेत्यांनीही फुटपाथवर अतिक्रमण केले आहे. या संदर्भात तक्रारीचा सूर उमटत आहे. महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने नियमित अतिक्रमण विरोधात कारवाईची मोहीम राबविण्यात येते परंतु फुटपाथ वगैरे इतर ठिकाणी रहदारी अडथळा येईल असे अतिक्रमण पुन्हा केले जाते. येत्या दोन दिवसात सोलापूर शहरातील फुटपाथ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी कारवाईची मोहीम हाती घेण्यात येत आहे. लवकरच शहरातील फुटपाथ हे नागरिकांसाठी मोकळे करण्यात येतील, अशी माहिती महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी दिली.

       सोलापूर महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी भाजी मंडई मध्ये भाजी विक्रेत्यांसाठी

ओटे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र विजापूर रोड सत्तर फूट रोड यासह विविध ठिकाणी भाजी मंडईतील ओट्यांवर भाजी विक्री न करता रहदारीस अडथळा येईल अशा प्रकारे फुटपाथवर व रस्त्यावर भाजी विक्री केली जाते. त्यांच्यावर याहीपूर्वी कारवाई केली आहे. आता पुन्हा रहदारीस अडथळा करणाऱ्या भाजीविक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. भाजीपाल्यासह सर्व साहित्य जप्त करण्यात येईल. प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे जगन्नाथ बनसोडे यांनी स्पष्ट केले.

       महापालिका आयुक्त शीतल तेली -उगले यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विरोधात मोहीम राबविण्यात येत आहे. सोलापूर शहरातील नागरिकांनी नियमानुसार आपल्या जागेतच व्यवसाय थाटावा. रहदारीस अडथळा निर्माण करून अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन जगन्नाथ बनसोडे यांनी केले आहे.

        दरम्यान, हरीभाई देवकरण प्रशालेच्या लगत असलेल्या रस्त्यावर अनधिकृतपणे बांधण्यात आलेले गाळे पाडून घेण्यासंदर्भात संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यासाठी मुदत दिली आहे. या संदर्भात महापालिका नगररचना विभागाकडून अतिक्रमण विभागास अद्याप कोणतीही कारवाईची सूचना करण्यात आली नाही. या सूचना आल्यानंतर आदेशानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी स्पष्ट केले.    

    निर्मिती विहारमध्ये अतिक्रमण विरोधात कारवाई 

शहरातील विजापूर रोडवरील झोन क्रमांक पाच अंतर्गत असलेल्या निर्मिती विहार मध्ये आज सोमवारी अतिक्रमण विरोधात कारवाई करण्यात आली. निर्मिती विहार सोसायटीच्या रस्त्यावर एकाने अनधिकृत पणे लावण्यात आलेले प्रवेशद्वार (गेट) काढण्यात आले. जेसीबीच्या साह्याने कट्टे व फरशा निष्काशीत करण्यात आल्या. येथील अनधिकृतपणे लावण्यात आलेले दोन प्रवेशद्वार जप्त करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *