
सोलापूर (प्रतिनिधी) शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महाडिक व त्यांचे पथक पोलीस आयुक्तालय हददीमध्ये खाजगी वाहनाने गस्त घालत असताना,मिळालेल्या गुप्त खबरीनुसार जुनी मिल कंपाऊंड समोरील करजगी कॉम्प्लेक्सच्या मोकळ्या मैदानात एका तरुणास ताब्यात घेतले.त्याची अंगझडती घेता,तो चोरीचे मोबाईल विक्रीच्या उद्देशाने त्या ठिकाणी आल्याची बाब चौकशीत निष्पन्न झाली.गुन्हे शाखेला ३ गुन्हे उघडकीस आले असून, १,००,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.जुनी मिल कंपाऊंडमधील मोकळ्या पटांगणात तो संशयित दिसला.पथक त्याच्याजवळ जात असताना तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पथकाने त्याच ताब्यात घेतले.त्याच्या चौकशीत,त्याने त्याचं नाव उमेश बंडु उकरंडे (वय-४५, रा.मल्लीकार्जुन नगर,अक्कलकोट रोड) असे असल्याचे सांगितले.
त्याच्या अंगझडतीत,त्याचेजवळ असलेल्या काळ्या रंगाच्या बॅगेमध्ये एक ओपो कंपनीचा मोबाईल,एक रेडमी कंपनीचा मोबाईल,आधार कार्ड,पॅनकार्ड,ओळखपत्र,अॅक्सिस बँकेचे डेबिट कार्ड,आयसीआयसीआय बँकेचे क्रेडीट कार्ड, इंग्रजीत लिहीलेले इयर पॉड व अॅपल कंपनीचा मोबाईल चार्जर, एक काळ्या रंगाची बॅग, लॅपटॉप व लॅपटॉप चार्जर असे साहित्य मिळून आले.ते साहित्य चोरी करुन आणल्याची कबुली दिली.त्याअनुषंगाने अभिलेख पडताळला असता, जोडभावी फौजदार चावडी आणि लोहमार्ग पोलीस ठाणे गुन्ह्यातील मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम.राजकुमार,पोलीस उप- आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ.दीपाली काळे,सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रांजली सोनवणे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) सुनिल दोरगे,यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडीक,पोह.अंकुश भोसले, पोना.शैलेश बुगड,पोकॉ.राजकुमार वाघमारे,पोकॉ.अभिजीत धायगुडे यांनी पार पाडली.