शासनाच्या प्रचार प्रसार समन्वयकपदी
प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची नियुक्ती
सोलापूर : राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती सामान्य माणसांपर्यंत पोहोचविणे, त्यासाठी प्रभावी प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची मुख्यमंत्री जनकल्याण कक्षात राज्य प्रचार व प्रसार समन्वयकपदी नियुक्ती केली आहे.
प्रा. डॉ. वाघमारे यांची दीड वर्षांपूर्वी शिवसेनेच्या राज्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांची कामगिरी पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची राज्य शासनाच्या प्रचार व प्रसार समन्वयकपदी नियुक्ती केली आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत जनतेच्या विकासासाठी योजना राबविण्यात येतात. मात्र, त्या कल्याणकारी योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचू न शकल्यामुळे कित्येक लोकांना त्या योजनांपासून वंचित राहावे लागते. शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती, त्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सचिवालयात मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षामार्फत शासन आपल्या दारी व मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची तसेच योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता त्यांच्यावर राज्याच्या प्रचार व प्रसार समन्वयकपदाची जबाबदारी देण्यात आल्यामुळे सोलापूरच्या लौकिकात भर पडली आहे.