
नवी पेठेतील ऐतिहासिक इमारत परिसरातील
सुलभ शौचालयाचे बांधकाम थांबवा
महापालिका कामगार संघटना संघर्ष समितीने दिला आंदोलनाचा इशारा
सोलापूर : पारतंत्र्यातही तिरंगा ध्वज फडकलेल्या ऐतिहासिक अशा नवी पेठेतील महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या हेरिटेज इमारत आवारातील सुलभ शौचालय बांधकाम थांबविण्यात यावे. या परिसराचे पावित्र्य राखावे आणि इतरत्र शौचालय बांधकाम करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना संघर्ष समितीच्या वतीने निवेदनाद्वारे दिला आहे.
सोलापूर शहरातील मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या नवी पेठेत महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाची हेरिटेज इमारत आहे. या ठिकाणी जुन्या नगरपालिकेचा कारभार चालत होता. पारतंत्र्यातही तिरंगा ध्वज फडकवलेल्या ऐतिहासिक इमारत आवारात महापालिकेच्या माध्यमातून वातानुकूलित सुलभ शौचालयाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. पायाचे खोदकाम केले आहे. याला सुजाण नागरिकांतून तीव्र विरोध होत आहे.
दरम्यान, महापालिका आयुक्त कार्यालयात याबाबत महापालिका कामगार संघटना संघर्ष समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जुन्या नगरपालिकेची ही ऐतिहासिक इमारत आहे. हेरिटेज वास्तू , स्वातंत्र्यलढ्याची साक्ष देणारी ही इमारत आहे. पारतंत्र्यातही
तिरंगा ध्वज डोलाने फडकविण्यात आला होता. असे असताना महापालिकेच्या माध्यमातून इथे शौचालयाचे बांधकाम करण्यात येत आहे. ही खेदजनक बाब आहे. शौचालयाचे बांधकाम तात्काळ थांबवावे. ते इतर ठिकाणी करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी संस्थापक अध्यक्ष जनार्दन शिंदे, अध्यक्ष सायमन गट्टू, प्रसिद्धी प्रमुख शिवाजी कांबळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
बाजारपेठेत महिलांसाठी शौचालयाची
गरज : नगर अभियंता आकुलवार
नवी पेठेत बाहेर गावातून महिला येतात. त्यांच्यासाठी स्वच्छतागृह ही मूलभूत सुविधा गरजेची आहे. तशी मागणी नागरिकातून होती. या परिसरात महापालिकेच्या मालिकीची या ठिकाणीच जागा उपलब्ध आहे. त्यामुळे येथे बांधकाम करण्यात येत आहे. या ऐतिहासिक इमारतीला कोणताही धोका न पोहोचवता शेजारी कंपाउंड घालून हे शौचालय बांधण्यात येणार आहे. शेजारील शॉपिंग सेंटर मध्ये केवळ गाळेधारकांसाठी स्वच्छतागृहची सोय आहे. इतरांसाठी नाही, असे महापालिका नगर अभियंता सारिका आकुलवार यांनी स्पष्ट केले.