सात रस्ता येथे अतिक्रमण विरोधात कारवाई
जेसीबीच्या सहाय्याने हॉटेल, २ खोके केले
निष्कासित
सोलापूर : सोलापूर महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने मंगळवारी सात रस्ता येथे अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. येथील स्टार हॉटेल आणि दोन खोके जेसीबीच्या साह्याने निष्काशीत करण्यात आले.
महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. सोलापूर शहरात रहदारीस अडथळा ठरणारे , फुटपातवर त्याचबरोबर नियमबाह्यरित्या अतिक्रमण करण्यात येत असल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्यात येत आहे.
दरम्यान, आज सात रस्ता येथे पत्र्याच्या चार गाळ्यात थाटण्यात आलेले स्टार हॉटेल आणि शेजारील दोन खोके जेसीबीच्या साह्याने निष्काषित करण्यात आले. यावेळी हॉटेल व्यावसायिक व महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. मात्र बंदोबस्तातील पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने कारवाई सुरूच ठेवण्यात आली.
या कारवाई दरम्यान सात रस्ता परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. शहरातील नागरिकांनी व व्यावसायिकांनी आपापले उद्योग व व्यवसाय कायदेशीर जागेतच अतिक्रमण न करता करावेत अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी दिला आहे.