सारथीचा युथ फाऊंडेशनचा १४वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

प्रतिनिधी-सोलापूर

सारथी युथ फाऊंडेशन या सामाजिक संस्थेचा १४ वा वर्धापन दिन समाज कल्याण केंद्र रंगभवन येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष थिटे व सासवड येथील काँज टु कनेक्ट, हुनर गुरुकुल या सामाजिक संस्थेचे संस्थापक अनिरुद्ध बनसोड हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते.
सारथी युथ फाऊंडेशनचे सचिव रामचंद्र वाघमारे यांनी आपल्या प्रास्ताविकात सारथी युथ फाऊंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला. गेल्या 14 वर्षांमध्ये सारथी युथ फाऊंडेशनने अडीच लाख लाभार्थ्यांना लाभ दिला आहे. याविषयी त्यांनी या वेळी विशेष नमूद केले. मागील वर्षभरामध्ये तंबाखू व्यसनमुक्ती विषयी शाळा, महाविद्यालये, समुदाय स्तरावरती घेण्यात आलेले जनजागृती कार्यक्रम, सत्र, पोस्टर प्रदर्शन, आरोग्य तपासणी शिबीरे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्या व्यक्तींसाठी अनामिक स्वमदत गट बैठक, कामगार कुटुंबातील स्त्रियांसाठी शिलाई प्रशिक्षण वर्ग, पुरुषांसाठी तीन चाकी व चार चाकी वाहन चालक प्रशिक्षण, शालेय व महाविद्यालयीन युवकांसाठी डिजिटल साक्षरता प्रशिक्षण, यासोबत विविध प्रकारचे कौशल्य आधारित उद्योजकता मार्गदर्शन उपक्रम व शिबीर याविषयीचा आढावा यावेळी त्यांनी घेतला.
डॉ. संतोष थिटे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की , तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनमुक्तीसाठी कार्य करणे हे अगदी कष्टदायक बाब आहे. सारथी युथ फाउंडेशन या विषयावरती अनेक वर्षांपासून कार्य करते आहे. त्यांच्या या चिकाटीच्या कामाचं कौतुक होणं गरजेचं आहे. केवळ सारथी फाउंडेशननेच या विषयावर काम करावं असं नाही तर आपल्यासारख्या असंख्य लोकांनी यांच्या या समाजोपयोगी कार्यामध्ये जोडून आपणही सामाजिक बांधिलकी जपावी. आपणही यांच्या कार्याला मदत करावी.अनिरुद्ध बनसोड बोलताना म्हणाले की, तंबाखू व्यसनमुक्ती सोबत रोजगार निर्मितीसाठी कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्यात सातत्य ठेवले आणि व्यक्ती विकासासोबत कौटुंबिक विकास साधण्यासाठी सारथीने केलेले कार्य कौतुकास्पद आहे.
या प्रसंगी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ दुष्परिणामाची माहिती देणारे पथनाट्य सारथी स्वयंसेवक व वालचंद महाविद्यालय समाजकार्य विभागातील विद्यार्थ्यांनी सादर केले. व्यसनमुक्ती दिन, राष्ट्रीय युवा दिन आणि कर्करोग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण, सहभागी शाळा महाविद्यालयाचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला. तंबाखू व्यसनमुक्ती क्षेत्रात योगदान दिलेल्या पत्रकार व उत्कृष्ट स्वयंसेवक तसेच संस्थेचे डोनेशन बाँक्स ठेवून देणगी उभारणी करिता योगदान दिलेल्या दात्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. सारथी युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष अँड. जावेद नगारे, उपाध्यक्ष श्री. सिद्धेश्वर घोडके, खजिनदार श्रीमती सुदर्शना भंडारी, कोअर कमिटी सदस्य प्रसाद अतनुरकर, तुकाराम चाबुकस्वार, बसवराज जमखंडी, हणुमंत सलगर, स्वयंसेवक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन श्री हनुमंत सलगर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *