
सिध्देश्वर परिवाराकडून प्रणितींना
दीड लाख मतांचे पाठबळ देऊ
शेतकरी, कामगारांच्या मेळाव्यात काडादी यांचा निर्धार
सोलापूर : विमानसेवेच्या नावाखाली भाजपने श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर शेतकरी सभासद आणि कामगारांचे अश्रू पुसण्यासाठी सर्वप्रथम धावून आलेल्या प्रणिती शिंदे यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी करण्यासाठी त्यांच्या पाठीशी दीड लाख मतांचे पाठबळ उभे करण्याचे आवाहन सिध्देश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी केले. त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत शेतकरी व कामगारांनी मोठे मताधिक्य देऊन प्रणिती शिंदे यांना निवडून लोकसभेत पाठविण्याचा निर्धार केला.
रविवारी, श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कर्मयोगी अप्पासाहेब काडादी सास्कृतिक भवन येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सिध्देश्वर परिवाराने शेतकरी व कामगारांचा भव्य मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी काडादी बोलत होते. याप्रसंगी मंचावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उमेदवार प्रणिती शिंदे, माजीमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, बाजार समितीचे माजी सभापती महादेव चाकोते, प्रकाश वानकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील आदी उपस्थित होते.
प्रारंभी ग्रामदैवत श्री सिध्देश्वर आणि कारखान्याचे संस्थापक कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुष्पराज काडादी यांनी प्रास्ताविकात उपस्थितांचे स्वागत करीत सोलापूरच्या विकासासाठी प्रणिती शिंदे यांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी धर्मराज काडादी म्हणाले, 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारात नरेंद्र मोदी यांनी देशातील भ्रष्टाचार संपवू, महागाई कमी करू अशी अनेक आश्वासने दिली होती. त्यावेळी मतदारांनी त्यांना केंद्रातील सत्ता दिली. आपल्या भागाचा विकास होईल, या अपेक्षेने सुशीलकुमार शिंदे यांनाही बाजूला सारून मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना निवडून दिले होते. परंतु, निवडून आल्यानंतर गेल्या दहा वर्षांत भाजपच्या या लोकप्रतिनिधींनी द्वेषाचेच राजकारण केले.
कर्मयोगी अप्पासाहेब काडादी आणि त्यांच्या तत्कालीन सहकार्यांनी सोलापूर व जिल्ह्याची हरितक्रांती व सर्वांगीण विकासाचे जे स्वप्न पाहिले होते ते साकार करण्यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे आणि माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते-पाटील या महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन काडादी यांनी केले.
यावेळी गुरुराज माळगे, शरणराज काडादी, सुरेश हसापुरे, चेतन नरोटे, बाळासाहेब शेळके, अमर पाटील, प्रकाश वानकर, मल्लिकार्जुन पाटील, अरविंद भडोळे-पाटील, जयदीप साठे, अशोक देवकते, अशोक पाटील, किणीकर, विजयकुमार हत्तुरे, लहू गायकवाड, प्रा. धर्मराज कारले, राजशेखर पाटील, अॅड. शिवशंकर बिराजदार, विद्यासागर मुलगे, विलास पाटील, हरिश्चंद्र आवताडे, अरुण लातुरे, सुरेश कुंभार, सुरेश झळकी, सिध्दाराम व्हनमाने, महादेव जम्मा, अंबण्णप्पा भंगे, बाळासाहेब पाटील, प्रकाश बिराजदार, प्रा. संतोष मेटकरी, मल्लिकार्जुन कळके, प्रभुराज मैंदर्गीकर, रतन रिक्के आदी उपस्थित होते. कारखान्याचे उपाध्यक्ष सिध्दाराम चाकोते यांनी आभार मानले.
कर्मयोगी अप्पासाहेब काडादी
सर्वधर्मसमभावाचे प्रतीक
श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांनी उभारलेला हा कारखाना धर्मराज काडादी हे समर्थपणे चालवत आहेत. सभासदांना चांगला दर देऊन त्यांचे हित जोपासतात. कर्मयोगी अप्पासाहेब काडादी हे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक आहेत, असे गौरवोद्गार सुशीलकुमार शिंदे यांनी काढले. त्यांनी उभारलेल्या कारखान्याची चिमणी पाडून भाजपने शेतकरी सभासद आणि कामगारांना दु:ख दिले. वास्तविक पाहता विमानसेवेसाठी या चिमणीचा अडथळा नव्हता. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचीही विमाने उतरली आहेत. चिमणी पाडल्यानंतरही विमानसेवेला एअर एव्हीएशन परवानगी मिळणार नाही, असे आपण अगोदरच सांगितले होते. तरीही भाजपने चांगल्या पध्दतीने चालू असलेल्या कारखान्याची चिमणी पाडून नुकसान केले. चिमणी पाडल्यानंतर दुसर्या दिवशीच विमानसेवा सुरू करू, असे सांगणारे आता कुठे आहेत, असा प्रश्न शिंदे यांनी केला.
शेतकर्यांच्या प्रश्नांवरून
प्रणिती शिंदे भावूक
निवडणुकीच्या रिंगणात उतरावे की नाही अशा द्विधा मनस्थितीत असताना ग्रामीण भागाचा दौरा करण्याचे निश्चित झाले. ग्रामीण भागामध्ये फिरत असताना काळ्या आईची सेवा करणार्या माझ्या मायबाप शेतकर्यांच्या चेहर्यावरील दुःख व हताशपणा पाहून वाईट वाटल,े असे सांगताना आमदार प्रणिती शिंदे भावूक झाल्या होत्या. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी पहिली प्रेरणा शेतकर्यांकडूनच मिळाली. त्यामुळे संसदेत पहिला आवाज शेतकर्यांच्या प्रश्नावरच उठवेन अशी ग्वाही दिली.