
सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी माकपचा काँग्रेसला पाठिंबा
काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्याचा व्यक्त केला निर्धार
कोणत्याही परिस्थितीत शहर मध्य विधानसभेची जागा माकपला सोडा
माकपचे माजी आ. नरसय्या आडम यांनी मांडली आग्रही भूमिका
सोलापूर : लोकसभेची ही निवडणूक अभूतपूर्व अशी आहे।. भविष्यात निवडणुका होतील की नाही याबाबत शंका व्यक्त होत आहे. देशभरात भाजप सरकार विरोधात प्रचंड संताप आणि नाराजी आहे. असंतोषाचा विस्फोट होऊन येत्या 4 जून नंतर केंद्रात नवे सरकार येईल असा दावा करीत सोलापूर लोकसभा राखीव मतदार संघात महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार आ. प्रणिती शिंदे यांना माकप पाठिंबा आहे. त्यांना निवडून आणण्याचा निर्धार आम्ही केला आहे. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची जागा आघाडी अंतर्गत माकपाला सोडावी, अशी आग्रही भूमिका माकपचे माजी आ. नरसय्या आडम यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
माकपच्या वतीने आज माजी आ. नरसय्या आडम यांनी सविस्तर राजकीय भूमिका मांडली. विविध मुद्द्यांवर आपली मते स्पष्ट केली. मुंबई येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष राज्य समितीची बैठक 1 व 2 मार्च रोजी माकपचे पॉलीट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे आणि निलोपतल बसू यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी आणि माकपची 18 व्या लोकसभा निवडणुकीबाबत राजकीय भूमिका, पाठिंबा आणि पुढील कार्यक्रमाची दिशा ठरविण्यात आली. त्यानुसार आज ही भूमिका मांडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सोलापूर जिल्हा हा सर्वदृष्टीने विकासाकडे नेण्यासाठी सक्षम आहे पण गेल्या दहा वर्षात याला योग्य गती मिळाली नाही. विकासाची योग्य दृष्टी नाही. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे म्हणून देशात राष्ट्रीय पातळीवर इंडिया आणि महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी ही जनतेच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी परिपूर्ण विकासाचे ध्येय घेऊन लोकसभेच्या निवडणुकीत उतरली आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार काँग्रेसच्या आ. प्रणिती शिंदे यांना माकपच्या वतीने जाहीर पाठिंबा देत असल्याचे नरसय्या आडम यांनी यावेळी जाहीर केले. मोठ्या मताधिक्याने प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. जनता विरोधी धोरणे राबवणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारचे उच्चाटन करण्यासाठी राज्य आणि सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रणिती शिंदे यांना प्रचंड मताधिक्क्याने विजयी करावे, असे आवाहनही यावेळी माजी आ. आडम यांनी केले.
मोदी सरकारच्या काळात तेलाचे भाव वाढले. या साडेनऊ वर्षात 400 रुपयेचा गॅस सिलेंडर 800 रुपयाला मिळतो. सर्वसामान्य जनतेला उभे राहणे मुश्किल झाले आहे. जीएसटी मुळे एक कोटी विडी कामगारांची अडचणीत आले आहेत. बेकारीने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सोरेन यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. आरोप पत्र नसतानाही अनेकांना जेलमध्ये घालण्यात येत आहे.
तब्बल 25 पुढारी तुरुंगात आहेत. बुद्धिजीवी, पत्रकार, साहित्यिक, राजकीय नेते असे एकूण तब्बल आठ हजार लोक हे देशाच्या विविध तुरुंगात आहेत.ईडी, सीबीआय व इन्कम टॅक्स यांचा भयानक गैरवापर करून लोकशाही मोडून काढण्याचा प्रयत्न होत आहे. जगात झाला नाही इतका मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या काळात झाला. निवडणूक रोखे अंतर्गत भांडवलदाराकडून 8 हजार 252 कोटी रुपयांचा निधी घेण्यात आला. धर्मनिरपेक्ष घटना असताना सर्व नियम पायदळी तुडवून राम मंदिर आणि संसद भावनाचे उद्घाटन झाले, असा आरोप आडम यांनी यावेळी केला.
या पत्रकार परिषदेस जिल्हा सचिव ॲड.एम.एच.शेख , रंगप्पा मरेड्डी, कुरमय्या म्हैत्रे,सिद्धप्पा कलशेट्टी,व्यंकटेश कोंगारी,युसुफ शेख, अब्राहम कुमार, नसीमा शेख,शेवंताताई देशमुख, सुनंदा बल्ला, ॲड. अनिल वासम आदी उपस्थिती होते.
रे नगर मध्ये भाजपवाल्यांची एक वीटही नाही
सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप कडून रे नगर उभारले असल्याचा प्रचार केला जात आहे याबद्दल विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात माजी आ. आडम म्हणाले, रे नगरच्या उभारणीत आमची मेहनत आहे. आम्ही केलेल्या मेहनतीचे ते फळ आहे. विविध मागण्यांसाठी सरकार पुढे जावेच लागते. तो आमचा हक्क आहे. रे नगरच्या च्या बांधणीमध्ये एक वीटही भाजपची नाही असा टोला आडम यांनी लगावला.
शहर मध्य जागेसंदर्भात
सोनिया गांधी निर्णय घेतील…!
सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात माकपने
काँग्रेसच्या आ. प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यांना निवडून आणण्याचा आम्ही निर्धार केला आहे. तसे प्रयत्न करत आहोत. आ. प्रणिती शिंदे या लोकसभा निवडणुकीत निवडून येणारच आहेत. तेव्हा सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची जागा माकपला सोडावी अशी आमची आग्रही मागणी आहे. या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर माकपचे नेते सिताराम येच्युरी या संदर्भात बोलणार आहे. सोनिया गांधी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
तर आ. प्रणिती शिंदे यांनी राज्यसभेवर जावे
आणि शहर मध्यची जागा माकपालाच सोडावी
दरम्यान, आ. प्रणिती शिंदे या लोकसभा निवडणुकीत विजयी होणारच आहेत परंतु जरी तसे न झाल्यास आमदार प्रणिती शिंदे या राज्यसभेवर जावे मात्र सोलापूर शहर मध्य ची जागा ही माकपालाच सोडावी लागेल. माकपाचा उमेदवार येथून निवडून जाईल, असा दावा माजी आ. आडम यांनी केला.