
सोलापूर शहरात विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस
निराळे वस्तीत नारळाच्या झाडावर कोसळली वीज
पापय्या तालीम परिसरात उन्मळून पडले झाड
सोलापूर : सोलापूर शहरात एकीकडे तापमान वाढले असतानाच रात्री विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसात शहरातील निराळे वस्ती येथील एका नारळाच्या झाडावर वीज कोसळली पपया तालीम परिसरात एक झाड उन्मळून पडल्याची घटना घडली आहे.
बुधवारी दिवसभर उकाड्याने सोलापूरकरांना हैराण केल्यानंतर शहरात सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पडलेल्या अवकाळी पावसात जुनी पोलीस लाईन, हिरज नाका, निराळे वस्ती येथे नारळाच्या झाडावर वीज पडून झाडाला आग लागल्याची घटना घडली. जुनी मिल येथील पापय्या तालीम परिसरात रस्त्यावर एक झाड पडल्याने काही काळ वाहतुक संथ झाली होती.
रात्री पावणे आठ वाजता सुरू झालेला अवकाळी पाऊस सुमारे तासभर सुरू होता. अवकाळी पावसामुळे शहर परिसरात काही काळ गारवा निर्माण झाला होता. अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे शहर परिसरात नागरिकांची व व्यावसायिकांची एकच धावपळ उडाली. वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांबांवरील तारा एकमेकांना चिकटून विद्युत खांबावर ठिणग्या उडाल्याने सिद्धेश्वर प्रशाला परिसरातील विद्युत प्रवाह काही काळासाठी बंद झाला होता.
जुनी पोलीस लाईन, हिरज नाका, निराळे वस्ती येथील नारळाच्या झाडावर वीज पडून आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ निराळे वस्तीत धाव घेत आग विझवली. झाडाला लागलेली आग विझवल्यानंतर अग्निशमन दलाने पापय्या तालीम येथे रस्त्यावर पडलेले झाड हटवण्यासाठी आपले दल लागलीच रवाना केले. अवकाळी पावसामुळे उद्भवलेल्या या दोन्ही आपत्कालीन घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा कोणीही जखमी झाले नसल्याचे महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, सोलापूर शहरातील सकल भागात या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसून आले. अचानक झालेल्य या अवकाळी पावसामुळे
चाकरमान्यांची धावपळ उडाली. घरी परतत असतानाच लागलेल्या या पावसाने अनेकांनी आडोसा घेतला.