सोलापूर शहराला  लवकरच ४ ऐवजी ५ दिवसाआड पाणीपुरवठा

सोलापूर शहराला  लवकरच ४ ऐवजी ५ दिवसाआड पाणीपुरवठा

उपलब्ध पाणीसाठ्यात जून पर्यंत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन 

 पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर होणार कारवाई 

सोलापूर : उपलब्ध पाणीसाठ्यात जून पर्यंत पाणीपुरवठा करण्याचे आतापासूनच नियोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून लवकरच शहराचा पाणीपुरवठा ४ ऐवजी ५ दिवसाआड करण्यात येणार आहे. दरम्यान, 

पाणीपुरवठ्या दिवशी पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर महापालिकेच्या पथकांकडून कारवाई करण्यात येणार आहे.

         उजनी धरण आणि औज बंधाऱ्यातील उपलब्ध पाणी साठ्यातून पुढील पावसाळ्यापर्यंत पाणीपुरवठा करता यावा यासाठी महापालिका प्रशासन आणि पाणीपुरवठा विभागाने आतापासूनच नियोजन आखले आहे. लवकरच शहराचा पाणीपुरवठा ४ ऐवजी ५ दिवसाआड करण्यात येणार आहे.

  यामुळे शहरवासीयांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याची सवय घालून घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

           सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारे उजनी धरण हे सध्या वजा ३८ पर्यंत गेले आहे. तर उजनी धरणातून शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी नदीवाटे सोडण्यात आलेले औज बंधाऱ्यातील पाणीदेखील सध्याच्या परिस्थितीनुसार पाणीपुरवठा केल्यास मे अखेरपर्यंत चालण्याची शक्यता आहे. त्यात कडक उन्हामुळे बाष्प होऊन पाण्याची पातळी कमी होते. तसेच शहराच्या एका भागाला पाणीपुरवठा करण्यात येणारे हिप्परगा तलाव येथील पाणीदेखील उन्हाळ्यात पुरणारे नाही. या सर्व गोष्टींचा विचार करता आहे त्या उपलब्ध पाणी साठ्यात शहराला पावसाळा सुरू होईपर्यंत अर्थातच जून मध्यपर्यंत शहराला पाणीपुरवठा करता यावे. यासाठी महापालिका प्रशासन आणि पाणीपुरवठा विभागाकडून विविध उपायोजना आणि नियोजन करण्यात आले आहे.

         दरम्यान, उजनी धरण हे वजा ५० मध्ये गेल्यानंतर महापालिका प्रशासनाने आधीच संपूर्ण तयारी करून ठेवलेली दुबार- तिबार पंपिंग करून शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. उजनी धरणातील पाणीसाठा वजा ५० पर्यंत जाण्याची स्थिती मे महिन्यात उद्भवणार आहे. किंवा त्याच्यापूर्वी ही प्रक्रिया सुरू करून पाणीपुरवठा करावा लागणार आहे. यासाठी शहराला लवकरच चार ऐवजी पाच दिवसाआड पाणीपुरवठा  करण्यात येणार आहे.

       सोलापूर शहरवासीयांनी याचा काटकसरीने वापर करावा.पाण्याची नासाडी करू नये. याबाबत जनजागृती देखील करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

पाण्याची नासाडी करणाऱ्यावर करडी नजर

सोलापूर शहरात नित्य ज्या भागांमध्ये पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्या दिवशी त्या- त्या भागात महापालिकेतील विशेष पथके पाण्याची नासाडी करणाऱ्यावर करडी नजर ठेवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय आत्तापासूनच शहरातील नागरिकांनी कमी पाणी साठवणुकीतून पाणी वापराचे नियोजन करावे, असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *