उड्डाण पुलाच्या कामामुळे मार्कंडेय उद्यानातील
स्वातंत्र्यवीर सावरकरांची भित्तीशिल्पे हलविली सुरक्षित स्थळी !
उद्यानात स्वच्छतेचीसह इतर कामे सुरू !
सोलापूर : नियोजित उड्डाणपुलाच्या कामामुळे भविष्यात मार्कंडेय उद्यानातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भित्तीचित्र शिल्पांना बाधा होऊ नये म्हणून ती सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली आहेत. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर नियोजित जागेत पुन्हा ही शिल्पे बसविण्यात येणार आहेत. दरम्यान, या ठिकाणी स्वच्छतेसह इतर देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आयुष्याची २३ वर्षे अंदमान, रत्नागिरीसारख्या काळकोठडीत शिक्षा भोगलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सोलापूरशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील मार्कंडेय उद्यान येथे वीर सावरकर भक्तांच्या प्रयत्नाने त्यांचा पुतळा उभारण्यात आला. वीर सावरकरांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांची शिल्पे साकारून स्वातंत्र्य चळवळीचा जाज्वल्य इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यासाठी सोलापूर महापालिका ,सावरकर स्मारक समितीसह तत्कालीन मंत्र्यांनी निधी दिला होता.
या उद्यानात भीतीचित्र शिल्पामध्ये परदेशी कपड्यांची होळी, सावरकर पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना विदेशी कपड्यांची होळी करण्याच्या निमित्ताने लोकमान्य टिळकांची भेट ,
सावरकरांना पन्नास वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यानंतर बोटीतून फ्रान्समार्गे अंदमानला घेऊन जाताना त्यांनी बोटीतून उडी मारून मातृभूमीला परत येण्यासाठी केलेला प्रयत्न, जेलमध्ये दररोज पंचवीस लिटर तेल काढण्याची शिक्षा दिली जात होती. भारतमातेचा जयजयकार केला तरी फटक्यांची शिक्षा दिली जात असे़ हा प्रसंग,
श्री पतीत पावन मंदिर सह येथे विविध प्रेरक चित्र शिल्पे साकारण्यात आली होती.
दरम्यान, जुना बोरामणी नाका ते मोरारका बंगला पर्यंत दुसऱ्या फेजमधील उड्डाण पुलाचे काम होणार आहे. यासाठी आवश्यक ती प्रक्रिया प्रशासनाकडून राबविणत येत आहे. नगर रचना विभागाकडून बाधित जागेवर खुणा (मार्किंग) करण्यात आल्या आहेत. या उड्डाणपूलाअंतर्गत अशोक चौक जवळील मार्कंडेय उद्यानातील सुमारे २५ ते ३० टक्के भाग बाधित होणार आहे. उड्डाण पुलाचे काम सुरू झाल्यानंतर या बाधित होणाऱ्या जागेवरील मार्कंडेय उद्यानातील आवश्यकतेनुसार काही भाग पाडण्यात येणार आहे. दरम्यान, भविष्यात उड्डाण पुलाच्या कामामुळे भित्ती शिल्पास बाधा होऊ नये याची
काळजी घ्यावी, ही शिल्पे सुरक्षित स्थळी ठेवण्यात यावी, अशी मागणी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमींकडून करण्यात आली होती. त्यानुसार ही शिल्पे सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली आहेत, अशी माहिती झोन अधिकारी महेश क्षीरसागर यांनी दिली.
दरम्यान, मार्कंडेय उद्यानात समोरच्या बाजूला कंपाउंड लगत स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भीती शिल्पे साकारण्यात आली होती. तसेच समोरच्या बाजूला कोपऱ्यात श्री पतीत पावन मंदिरही साकारण्यात आले होते. या ठिकाणी असलेली ही भित्तीचित्र शिल्पे महापालिका प्रशासनाकडून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली आहेत. भविष्यात कोणतीही बाधा होऊ नये याची काळजी प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर नियोजित ठिकाणी ही भिंतीचित्र शिल्पे पुन्हा बसविण्यात येणार आहेत.
या उद्यानात रंगरंगोटी, स्वच्छता आणि इतर देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत. मागील महिन्यात भाजपाचे माजी खा. ऍड.शरद बनसोडे यांनी या उद्यानास भेट देऊन येथील दुरावस्थेबद्दल महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती.