
विनापरवाना होर्डिंग स्ट्रक्चर हटाव मोहिम सुरूच !
गॅस कटरच्या साह्याने मेकॅनिक चौकातील हटविले होर्डिंग स्ट्रक्चर
सोलापूर : शहरातील विविध ठिकाणी विनापरवाना, बेकायदेशीरित्या लावण्यात आलेले होर्डिंग स्ट्रक्चर हटविण्याची मोहीम महापालिकेच्या वतीने आज शुक्रवारी चौथ्या दिवशीही राबविण्यात आली. आज मेकॅनिक चौक येथील एका इमारतीवरील विनापरवाना लावण्यात आलेले होर्डिंग स्ट्रक्चर गॅस कटरच्या साह्याने काढण्यात आले.
मुंबई येथील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेने शहरातील विनापरवाना लावण्यात आलेले होर्डिंग हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, यापूर्वीच विनापरवाना लावण्यात आलेल्या होर्डिंग स्ट्रक्चरच्या 13 इमारत मालकांना महापालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागाच्या वतीने नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. 24 तासाच्या आत विनापरवाना लावलेले होर्डिंग स्ट्रक्चर काढण्यात यावे असे सूचित करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवार दि. 21 मे 2024 पासून हे विनापरवाना होर्डिंग हटवण्यास महापालिका पथकाने सुरुवात केली. यापूर्वी तीन होर्डिंग स्ट्रक्चर काढण्यात आले आहेत. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील कमल हॉटेल वरील होर्डिंग स्ट्रक्चर त्यांनी स्वतःहून काढून घेतले आहे.
महापालिका भूमी व मालमत्ता विभागाच्या वतीने आज शुक्रवारी चौथ्या दिवशी मेकॅनिक चौक येथील झुंजार मोटर्स या इमारतीवरील होर्डिंग लोखंडी स्ट्रक्चर गॅस कटरच्या साह्याने फॅब्रिकेटर्सच्या कामगारांकडून पूर्णपणे काढण्यात आले. टप्प्याटप्प्याने नोटीस बजावलेले सर्व अनधिकृत होर्डिंग काढण्याची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली.
यावेळी महापालिका भूमी व मालमत्ता विभागाचे प्रमुख आर.एम. पेंढारी ,कनिष्ठ अभियंता विक्रम पाटील यांच्यासह विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.