ड्रेनेजच्या तुटलेल्या झाकणावर रांगोळी काढून वाहिली फुले
निद्रिस्त महापालिका !!! नागरिकांनो, झाकणापासून सावध राहाचा लावला फलकसोलापुरात शिवसेना उबाठा पक्षाचे अभिनव आंदोलन
सोलापूर : हुतात्मा स्मृती मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर ड्रेनेजच्या फुटलेल्या झाकणावर रांगोळी काढून त्यावर फुले वाहत “हे झाकण धोकादायक आहे! नागरिकांनो सावधान !!” असा फलक लावत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज अभिनव आंदोलन करण्यात आले.
सोलापूर महापालिकेच्या लगत असलेल्या हुतात्मा स्मृती मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर फुटपाथवर तुटलेल्या अवस्थेत ड्रेनेजचे झाकण आहे. त्यावरून दररोज लोक ये – जा करतात. या तुटलेल्या झाकणात पाय जाऊन नागरिक जखमी होण्याची शक्यता आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले.
यावेळी तुटलेल्या झाकणावर सुरुवातीला रांगोळी काढण्यात आली. त्यानंतर त्यावर फुले वाहण्यात आली तसेच या ठिकाणी सावधानतेचा फलक लावण्यात आला. “हे झाकण धोकादायक आहे ! निद्रिस्त महापालिका!! नागरिकांनो सावधान !! झाकणापासून सावध रहा!! अशा आशयाचा फलक लावला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सोलापूर महापालिका प्रशासनाला यापूर्वीही शहरातील अशा प्रकारच्या घटनांकडे लक्ष वेधले होते. तरीही महापालिकेला जाग येईना. यामुळे आज पुन्हा अशा प्रकारे अभिनव आंदोलन करून महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. महापालिकेला जाग येईना ही दुर्दैवी बाब आहे असा आरोप करत शहरप्रमुख महेश धाराशिवकर आणि उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी महापालिका प्रशासनाचा धिक्कार केला.