शहरात १५ नागरी आरोग्य केंद्र, ८ आरोग्य वर्धिनी केंद्रात उष्माघाताचे कक्ष स्थापन
सोलापूर : राज्यात पुढील काही दिवस सरासरीच्या तुलनेत तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तेव्हा उष्माघाताचा फटका बसू नये म्हणून आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील १५ नागरी आरोग्य केंद्र, आठ आरोग्य वर्धिनी केंद्रात उष्माघाताचे कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. अशातच सोलापूर शहरासह जिल्ह्याचे तापमान चाळिशीकडे आगेकूच करीत आहे. तेव्हा यामुळे उष्माघात होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे सोलापूर महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, सोलापूर शहरात 15 नागरी आरोग्य केंद्र आणि आठ आरोग्यवर्धिनी केंद्रात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इथे आवश्यक ती उपचाराची सोय करण्यात आली आहे.
लहान मुले तसेच पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. तापमान अधिक असल्यास श्रमाची कामे टाळावी.भरपूर पाणी प्यावे व पौष्टिक आहाराचा जेवणात समावेश करावा अशा प्रकारची काळजी लोकांनी घेण्याची गरज आहे.
उष्माघात बाधित आल्यास
उपचाराची सोय : डॉ. कुलकर्णी
मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील पंधरा नागरी आरोग्य केंद्र व आठ वर्धिनी केंद्रामध्ये उष्माघात कक्षाच्या सोयी-सुविधा सुरू करण्यात आलेल्या आहेत. जर एखादा रुग्ण उष्माघात बाधित आल्यास त्यावर उपचार या ठिकाणी करण्याची सोय केली आहे. तसेच यासाठी लागणारा मुबलक औषध साठा उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे, अशी माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी कुलकर्णी यांनी दिली.
उष्माघाताची ही आहेत प्रमुख लक्षणे
चक्कर येणं, उलटी, मळमळ होणे, शरीराच तापमान खूप वाढणे पोटात कळा येणे, शरिरातील पाणी कमी होणे, पाय दुखणे, जड होणे, डोके जड होणे, चेहरा लाल होणे, रक्तदाब वाढणे, अशक्तपणा, त्वचा कोरडी पडणे अशी काही प्रमुख लक्षणे उष्णाघाताची दिसून येतात.