
सोलापूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मतदार जागृती अभियान अंतर्गत सोलापूर महापालिकेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका विभागाच्या वतीने शहरातील बचत गटाच्या माध्यमातून आज मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.
या रॅलीची सुरुवात डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक येथून करण्यात आली. त्याचे उद्घाटन सोलापूर महापालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलानी, जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार, तेजस शहा आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
ही रॅली साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, रामलाल चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे सोलापूर महानगरपालिका येथे या रॅलीची सांगता करण्यात आली. रॅलीच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली.
यावेळी सर्व समुदाय संघटक व दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत कार्यरत स्वयं सहायता गटातील 200 हून अधिक महिला सदस्य सहभागी झाल्या होत्या.