
जिल्ह्यातील तरुणांचा होणार ‘कौशल्य विकास’
शेकडो तरुणांना मिळणार उपक्रमांचा लाभ
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील तरुणांसह भारतातील २ कोटी तरुणांना कौशल्य विकास उपक्रमाचा लाभ मिळणार आहे. बजाज ग्रुपतर्फे समाजोपयोगी उपक्रमांसाठी पुढील पाच वर्षांत ५ हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
‘बजाज बियाँड’ या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) आणि धर्मादाय कार्यक्रमांसाठी सुरू करण्यात आलेल्या ग्रुपच्या नव्या विभागांतर्गत कौशल्य विकासावर पूर्ण लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.
यामुळे येत्या काळातील २ कोटींहून अधिक तरुणांचा फायदा होणार आहे आणि भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेमुळे उपलब्ध होणाऱ्या रोजगार व उद्योग संधींचा लाभ घेण्यासाठी त्यांना सक्षम करण्यात येणार आहे.
या उपक्रमांवर प्रतिक्रिया देताना बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर बजाज म्हणाले, “आमच्या उपक्रमांच्या माध्यमातून भारतातील तरुणांच्या सक्षमीकरणामध्ये परिवर्तनात्मक प्रभाव दिसून आला आहे. आज आम्ही ‘बजाज बियाँड’चे अनावरण करत आहोत. भविष्यातील पिढीला यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांनी सुसज्ज करण्याचे आमचे मिशन आम्ही या माध्यमातून सुरू ठेवणार आहोत.