वासुदेवाच्या वेशभूषेत पहिलीचा वेदांत करतोय मतदानासाठी जनजागृती

वासुदेवाच्या वेशभूषेत पहिलीचा वेदांत करतोय मतदानासाठी जनजागृती

सोलापूर  : वासुदेवाच्या वेशभूषेत  महापालिका शाळेतील इयत्ता पहिलीतील वेदांत वाघमारे हा विद्यार्थी मतदान करण्याची जनजागृती करत आहे .ऐक जरा मतदारा तुला लोकशाहीची आन, कर खुशाल निर्भयतेने तुझ्या हक्काचं मतदान असे आवाहन करतोय.    

           मतदार जनजागृती अभियान अंतर्गत विविध उपक्रम शाळेमध्ये राबविले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून मनपा मुलींची शाळा क्रमांक ०५ शाळेने मतदार जनजागृती वासुदेवच्या माध्यमातून या सर्व वस्ती मध्ये जनजागृती करण्याचे नियोजन केले आहे.

         पांढरे वस्तीच्या इयत्ता पहिली वर्गात शिकणाऱ्या वेदांत वाघमारे हा विद्यार्थी वासुदेवाच्या रूपात सकाळी सकाळी पांढरे वस्ती मधील भागात जाऊन मतदार जागृती कार्यक्रमांतर्गत “मतदान करणार मतदान” करण्यासंदर्भात कवितेतून आवाहन करत आहे. ऐक जरा मतदारा तुला लोकशाहीची आन, कर खुशाल निर्भयतेने तुझ्या हक्काचं मतदान या काव्यपंक्ती सादर करत तो जनजागृती करत आहे.

         पांढरे वस्ती, कळके वस्ती व परिसरात चार-पाच वस्तीमध्ये वृद्ध लोकांची संख्या जास्त आहे. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे मोबाईल किंवा अन्य साधने उपलब्ध नाहीत. त्या लोकांना मतदाराबाबत जागरूकता देखील नाही. त्यामुळे त्यांना मतदानाचे महत्त्व पटावे यासाठी पांढरेवस्ती मधीलच इयत्ता पहिलीतील विद्यार्थी आणि जुन्या काळातील हरवत चाललेल्या संस्कृतीचे प्रत्यय असलेल्या वासुदेवाच्या पेहरावांमध्ये, पोशाखामध्ये जाऊन मतदानाची तारीख, मतदानाची वेळ ही वृद्ध स्त्री-पुरुषांना सांगत आहे. लोकही कुतूहलाने तो काय सांगतोय यासाठी गोळा होत आहेत. 

            या कष्टकरी लोकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिनांक 7 मे रोजी मतदान करावे असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक अमोल भोसले व वर्गशिक्षक किरण शेळगे हे करत आहेत व त्याला पालकांचाही तितकाच प्रतिसाद लाभत आहे. गेल्या वेळेपेक्षा यावेळी मतदानाची टक्केवारी निश्चित वाढेल असा विश्वास देत आहेत.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *