विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली विविध विकास कामांची पाहणी  

पंढरपूर (प्रतिनिधी )पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या भाविकांना तसेच पंढरपूरात येणाऱ्या भाविकांना आवश्यक व दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातर्गंत करण्यात आलेल्या विविध कामांची पाहणी विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह, विभागीय आयुक्त नगर प्रशासनाच्या सहआयुक्त पुनम मेहता, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सार्वजनिक बांधकामचे अधिक्षक  अभियंता संजय माळी, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी राजेश तितर, प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, तहसीलदार सचिन लंगोटे, भिमा कालवा मंडळाचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव बागडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे कार्यकारी अभियंता अमित निमकर, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, उपआयुक्त आशिष लोकरे ,उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी विभागीय आयुक्त पुलकुंडवार म्हणाले, चंद्रभागा नदीचे पावित्र्य टिकावे यासाठी वेळोवेळी चंद्रभागा नदी पात्राची स्वच्छता करण्यात यावी. भाविकांनी व नागरिकांनी  निर्माल्य, कचरा नदीपात्रात टाकू नये यासाठी सूचना फलक लावावेत. तसेच लाऊड स्पिकरव्दारे सूचना देण्यात याव्यात. वारी व्यतिरिक्त दररोज पंढरपूरात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता आवश्यक ठिकाणी मोबाईल टॉयलेटची उपलब्धता ठेवावी. तसेच भाविकांसाठी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सुविधाबाबतचे माहिती फलक लावावेत. आषाढी यात्रा कालावधीत पावसाची शक्यता असल्याने 65 एकर येथील प्लॉटवर चिखल होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

    विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी अकलूज, वेळापूर भंडीशेगाव वाखरी येथील पालखी तळांची तसेच नाम संकीर्तन सभागृह ,पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, घाट, चंद्रभागा वाळवंट, 65 एकर, गोपाळपूर येथील जलशुध्दीकरण प्रकल्पाची  पाहणी केली.

यावेळी विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी  पालखी सोहळ्या सोबत येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी प्रशासनाकडून कोणत्या सुविधा उपलब्ध केल्या जातात याची माहिती घेऊन अधिकच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत नियोजन करावे अशा सूचना दिल्या. वाखरी पालखी तळावरील मधोमध असणाऱ्या विद्युत वाहक तारा व खांब  एका बाजूला सुरक्षित स्थळी लावण्यात यावेत. तसेच वारी कालावधीत भाविकांसाठी आरोग्य सुविधा, पिण्याचे पाणी, सुरक्षा, विद्युत व्यवस्था, गर्दी व्यवस्थापन, दर्शन व्यवस्था आदीबाबतीची माहिती घेवून आवश्यक सूचना त्यांनी केल्या.

यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी वारकरी-भाविकांना प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सोयाी सुविधांची माहिती दिली. मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदीर समिती कडून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली तर वारी कालावधतीत पोलीस प्रशासनाकडून भाविकांच्या सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *