वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी
चक्कर आल्यास किंवा थकवा जाणवू लागल्यास तत्काळ वैद्यकिय मदत घ्या
महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांचे आवाहन
सोलापूर : वाढत्या तापमानाचा शारिरिक क्रियेवर विपरीत परिणाम होवून आपत्कालिन परिस्थिती उदभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. चक्कर आल्यास किंवा थकवा जाणवू लागल्यास ताबडतोब जवळच्या मनपा दवाखान्यातून वैद्यकिय मदत घ्यावी,असे आवाहन महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे.
सद्यस्थितीत सोलापूर शहरातील तापमान संपूर्ण राज्यामध्ये उच्चांशकी असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या तापमानाचा शारिरिक क्रियेवर विपरीत परिणाम होवून आपत्कालिन परिस्थिती उदभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रसंगी मृत्यूही ओढवू शकतो. वाढत्या तापमानाचा शरीरावर होणारा विपरित परिणाम टाळण्यासाठी नागरीकांनी काळजी घ्यावी व स्वत:ला सुरक्षित ठेवावे.
नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. विशेषत: दुपारी 12 ते दुपारी 3 यावेळेत घराबाहेर पडणे टाळावे. जेव्हा शक्य असेल तेव्हा, तहान लागलेली नसेल तरीही पुरेसे पाणी प्यावे.फिक्या रंगाचे, हलके, तसेच सुती व सैलसर कपडे वापरावे.कामानिमित्त घराबाहेर पडावे लागलेच तर गॉगल, छत्री, टोपी,चपला, शुज घालून घराबाहेर पडावे.
दुपारी 12 ते दुपारी 3 यावेळेत शारीरिक कष्टाची कामे टाळावीत.घराबाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.चहा, कॉफी, शीतपेये, दारु यांचे सेवन टाळावे.चक्कर आल्यास किंवा थकवा जाणवू लागल्यास ताबडतोब जवळच्या मनपा दवाखान्यातून वैद्यकिय मदत घ्यावी. उन्हापासून बचाव करण्यासाठी तसेच शरीराचा ओलावा टिकवण्यासाठी जल संजीवनी ( ओ.आर एस), लस्सी, ताक, लिंबू शरबत वारंवार प्यावे.
उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्यास हे करा
उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्यास सबंधित व्यक्तीला सावलीत थंड व हवेशीर जागेत झोपवावे. त्याचे अंग ओल्या कपडयाने वांरवार पुसून घ्यावे. डोक्यावर थंड पाण्याच्या पटटया ठेवाव्या. व्यक्तीला जलसंजीवनी / लिंबू शरबत यासारख्या पातळ पदार्थ पिण्यास दयावे.
व्यक्तीला ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राकडे घेवून जावे कारण तीव्र उष्माघाताने रुग्ण आपला जीव गमावू शकतो. आवश्यक ती काळजी नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे.