देशी बनावटीचे ६ पिस्टल,३५ जिवंत राऊंड हस्तगत

सोलापूर (प्रतिनिधी) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणच्या पथकाने महत्वपूर्ण कामगिरी पार पाडली असून,४ संशयित आरोपीसह ६ बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्टल,३५ जिवंत राऊंड हस्तगत केले आहेत.

या कामगिरीची हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी पोलीस अधिकारी तसेच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यावर तसेच अवैद्य अग्निशस्त्रबाबत विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यासंदर्भात आदेश पारित केले होते.त्या दृष्टीने गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके व त्यांचे पथक यांना अवैध्य अग्निशस्त्राबाबत माहिती मिळाली,त्यानुसार टेंभुर्णी येथील एका हॉटेलच्या परिसरात दोन इसम देशी बनावटीचे गावठी पिस्टल बाळगून येणार आहे अशी माहिती मिळाली.त्या अनुषंगाने त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला असता,त्या ठिकाणी सदर दोन इसम आले.पथकाने त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन त्यांची अंग जडती घेतली असता,त्यांच्याकडे २ अवैद्य देशी बनावटीचे  पिस्टल व जिवंत राऊंड्स मिळून आल्या.त्या दोघांवर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.या पथकाने पुढे जाऊन कौशल्यपूर्ण तपास केला असता,त्यांनी सांगितले की आम्ही दोघे व आमचा अजून एक मित्र असे तिघे मागील काही दिवसांपूर्वी ऊस टोळी कामगार आणण्याकरिता धुळे जिल्ह्यात गेलो होतो.तेथे आम्हास मध्य प्रदेश सीमेवरील उमरटी गावात देशी बनावटीचे पिस्टन व राऊंड विकत मिळत असल्याबाबतची माहिती मिळाली,तेथून आम्ही ६ देशी बनावटीचे गावठी व ३५ जिवंत राऊंड विक्री करण्याकरिता गावी घेऊन आलो.त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकांनी तिसऱ्या साथीदाराच्या कब्जातून ३ पिस्टल व १९ जिवंत राऊंड्स हस्तगत केले.तसेच त्या तिघांनी विक्री केलेल्या एका इसमास ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल व ७ जिवंत राऊंड हस्तगत केले.या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी अजित नवनाथ पाडोळे (वय-३०.रा.शेवरे,ता.माढा) याच्यासह बिपिन तानाजी जाधव (वय-३५,रा.रामोशी गल्ली,टेंभुर्णी) आकाश मधुकर चव्हाण (रा.आडेगाव तालुका माढा),कर्णवीर उर्फ अतुल गपाटे रा.भिमानगर,तालुका माढा) या चारही आरोपींना अटक केली आहे.

हि कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके,फौजदार नारायण गोलेकर,फौजदार ख्वाजा मुजावर,पोलीस हेड कॉन्स्टेबल गाडे,मोहन मनसावाले,गायकवाड,अक्षय दळवी, अक्षर डोंगरे,पोलीस नाईक शेख यांनी बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *