काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

देशात सध्या अघोषित आणीबाणी सुरू 

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

भाजपने आता महागाई, भ्रष्टाचारावर बोलावे 

देशात संविधान, लोकशाही वाचवण्याची गरज 

सोलापूर : देशात संविधान बदलण्याचा घाट घातला जात आहे. समाजात द्वेष पसरवला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नको ते आरोप करत खोटे बोलत आहेत. देशात सध्या अघोषित आणीबाणी सुरू आहे असा आरोप करत भाजपने आता महागाई भ्रष्टाचार, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलले पाहिजे. भाजपाला स्वतःच्या ताकदीवर बहुमत मिळू शकणार नाही. सद्यस्थितीत लोकशाही आणि संविधान वाचवण्याची गरज आहे, अशी भूमिका काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

        सोलापूर लोकसभा राखीव मतदार संघातील इंडिया – महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसच्या उमेदवार आ. प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सभेच्या निमित्ताने सोलापुरात आले असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली. भाजप आणि मोदींच्या धोरणांवर त्यांनी सडकून टीका केली. 

        देशात सध्या अघोषित आणीबाणी सुरू आहे. हुकूमशाही आणि तानाशाहीची परिस्थिती आहे. संविधानाला धोका निर्माण झाला आहे अशा परिस्थितीत देशात भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसवायचं का असा प्रश्न यावेळी उपस्थित केला. भाजपाने मागील दहा वर्षात काय केले ? हे सांगावे. देशातील भ्रष्टाचार , बेरोजगारी , शेतकऱ्यांचे प्रश्न यासह ज्वलंत प्रश्नावर भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी. मोदींच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था घसरली. त्यांच्या नेतृत्वामुळेच अर्थव्यवस्था मंदावली आहे. नवीन कारखाने आले नाहीत तर जुनेही चालू नाहीत. नवे आर्थिक निर्णय घेतले नाहीत. व्यापाऱ्यांना वेळ न देता जीएसटी लादण्यात आली. त्यामुळे छोटे व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या पोटावर पाय दिला. रोजगार कमी झाले. देशावर 180 लाख कोटीचे कर्ज आहे. त्यामुळे मोदी सरकारने डिझेल, पेट्रोल वरील कर लावला. यामुळे देशात प्रचंड महागाई वाढली. पेट्रोल कराच्या माध्यमातून 32 लाख कोटी रुपये उभे केले. परिणामी महागाई वाढल्याने लोकांचे जगणे मुश्किल झाले. त्यामुळेच देशातील 80 कोटी जनतेला अन्नधान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला असल्याची टीका यावेळी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी केली. 

        काँग्रेसने उभारलेले सार्वजनिक उपक्रमाचे खाजगीकरण करण्याचा सपाटा भाजप सरकारने लावला आहे. आज भारत विकसित झाला असे सांगितले जात आहे मात्र काँग्रेसच्या काळात मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाच्या तुलनेत आर्थिक विकासाची गती कमी आहे. 

       मोदी सरकारच्या काळात आर्थिक भ्रष्टाचार, कमिशन, लाचखोरी, राजकीय भ्रष्टाचार झाला. कुणाला खोके दिली तर कुणावर ईडीची भीती दाखवली. साम-दाम-दंड-भेद नीती वापरण्यात आली. रोजगार दिला नाही मात्र ऑनलाईन जुगार सुरू केला असा आरोप करत दरवर्षाला दोन कोटी रोजगार देणार असल्याचे जाहीर केले मात्र मागील दहा वर्षात वीस कोटी रोजगार दिला का ? रोजगार का दिला नाही ? पंधरा लाख देण्याचा केवळ जुमला होता, अशी टीकाही यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. 

          शंभर दिवसात परदेशातून काळा पैसा आणतो असे मोदी म्हणाले होते. काळा पैसा आणला नाही. मात्र दुसरीकडे मोदींनी काळा पैसा असणाऱ्यांबरोबर सेटलमेंट केली. याचे उत्तर मोदींनी दिले पाहिजे. ईडी, सीबीआय च्या माणसांद्वारे हे सेटलमेंट करण्यात आले, असा आरोपही यावेळी चव्हाण यांनी केला. 

       देशातील शेतकरी आणि कर्मचारी यांच्या मुळेच देशाची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर आहे. यात मोदी सरकारचे योगदान नाही. 

 भारत देश हा 1947 मध्ये समृद्ध झाला होता. समृद्धीची व्याख्या भाजपने सांगावी. 6.5 विकासदर आहे असे सांगितले जाते. देशात दरडोई उत्पन्न 2 हजार 850 डॉलर आहे. दरडोई उत्पन्नावर विकासाचा स्तर ठरतो वास्तविक 13 हजार 500 डॉलर इतके दरडोई उत्पन्न आवश्यक आहे. हे अंतर कसे साधणार असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला. 

        या पत्रकार परिषदेस माजी आ. प्रकाश यलगुलवार, राजन कामत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

“वंचित” ने अजूनही विचार करावा 

ऍड. प्रकाश आंबेडकर हे मोठे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्या संदर्भात मी काही बोलू शकत नाही. मी एक छोटा माणूस आहे मात्र वंचित बहुजन आघाडीने अजूनही विचार करावा. वंचितच्या उमेदवारामुळे थेट भाजपला फायदा होतो, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

सोलापुरात काँग्रेसच्या आ. प्रणिती 

शिंदे यांची प्रचारात आघाडी

सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार आ. प्रणिती शिंदे यांना सर्वात आधी उमेदवारी निश्चित झाली. त्यांनी सुरुवातीपासूनच या मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. त्या बाहेरच्या उमेदवार नाहीत. त्यांना विजयी करण्याचे आवाहनही यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. 

मोदी विरुद्ध इंडिया आघाडी

 अशीही प्रमुख लढाई !

        तेव्हा बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यासह  विविध प्रश्न सोडविण्यासाठी, भ्रष्टाचार मुक्त भारत आणि संविधान वाचविण्यासाठी भाजपा आणि मोदीचा पराभव केला पाहिजे. आता भाजपला स्वतःच्या ताकदीवर बहुमत मिळू शकत नाही. मोदी विरुद्ध इंडिया आघाडी अशीही या निवडणुकीतील प्रमुख लढाई आहे. राम मंदिर बांधण्यात मोदींचा काय सहभाग होता असा सवालही यावेळी उपस्थित केला.काँग्रेसने जाहीरनाम्यातून जी आश्वासने दिली ती पूर्ण केली, असे ते म्हणाले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *