
केबल पाईप साठ्याला लागलेली आग अर्ध्या तासात विझविली
मरिआई चौकातील कचरा संकलन केंद्राजवळील घटना
सोलापूर : मरिआई चौकातील महापालिकेच्या कचरा संकलन केंद्राजवळ उघड्यावर ठेवलेल्या केबल पाईपच्या साठ्याला रविवारी आग लागली. ही आग केवळ अर्ध्या तासात विझविण्यात महापालिका अग्निशमन दलाला यश आले.
आज दिवसभरात उन्हाचा जोरदार कडाका होता. विशेष म्हणजे आज 43. 7 अंश सेल्सिअस इतके तापमान होते. दरम्यान, आज रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या आगीमुळे धुराचे लोट आकाशात उडाले होते. दुपारी दोन वाजता अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दलाच्या जवानांनी फोमचा मारा करून केवळ अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. दरम्यान हा पाईपचा साठा कोणाचा होता हे मात्र समजू शकले नाही. याबाबत अग्मिशमन दलदेखील अनभिज्ञ आहे.
दरम्यान, अग्निशमन दलाचे प्रमुख केदार आवटे यांनी सांगितले की, केबल पाईपचा साठा नक्की कोणाचा आहे, याविषयी आम्हाला माहिती नाही. आग लागूनदेखील यासंदर्भात कोणी हा माल आमचा आहे हे सांगण्यासाठी आमच्याशी संपर्क केला नाही.
एकंदर हा माल नक्की कोणाचा आहे, आगीत किती नुकसान झाले हे समजू शकले नाही.