
एससी, एसटी, ओबीसी यांच्या विकासासाठी कटिबद्ध
देशाचे संविधान कुणीही बदलू शकणार नाही
मलई खाण्यासाठी काँग्रेसला सत्ता हवी
मोदी सरकारने खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय दिला
सोलापुरातील महासभेत पंतप्रधान मोदींचा काँग्रेस – इंडिया आघाडीवर हल्लाबोल
सोलापूर : देशात काँग्रेसच्या साठ वर्षाच्या कार्यकाळात एससी, एसटी आणि ओबीसी यांचे हक्क डावले. त्यांना विकासापासून वंचित ठेवले. त्या उलट केवळ 10 वर्षात मोदी सरकारने एससी, एसटी व ओबीसी या घटकांना खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय दिला. त्यांच्या विकासाकडे प्राधान्याने लक्ष दिले असे सांगतानाच काँग्रेसला देश चालवायचा नाही, त्यांना देशाच्या भल्याची चिंता नाही तर मलई खायची आहे, अशी घणा घाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरात केली.
सोलापूर लोकसभा राखीव मतदार संघातील महायुती अंतर्गत भाजपाचे उमेदवार आ. राम सातपुते यांच्या प्रचारार्थ होम मैदानावर आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी विचार मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार यशवंत माने, माजी आमदार प्रशांत परिचारक, भाजपचे उमेदवार आ. राम सातपुते, रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, माजी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे, माजी आमदार नरसिंग मेंगजी , दीपक साळुंखे पाटील , दीपक भोसले, शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे , भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, लोकसभा विभाग समन्वयक शहाजी पवार, विक्रम देशमुख, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, शोभा बनशेट्टी, किशोर देशपांडे, शिवाजी सावंत, माजी गटनेते आनंद चंदनशिवे, अमोल शिंदे, उदयशंकर पाटील,रोहिणी तडवळकर, शिवानंद पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोलापुरातील या महासभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. गणागती घणाघाती टीका केली. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी एससी, एसटी, ओबीसी या घटकांसाठी मोदी सरकारने केलेल्या कामाचा आढावा मांडला. काँग्रेसच्या साठ वर्षातील कारकिर्दीची चिरफाड केली.
आपल्या जोशपूर्ण भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, जानेवारी महिन्यात सोलापूरला मी काही द्यायला आलो होतो. आज मी आपणाकडे आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे. मला धनदौलत नको. मला तुमचे आशीर्वाद पाहिजे. पुढील पाच वर्षासाठी विकासाच्या गॅरंटीला आपण निवडून द्याल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
सन 2014 पूर्वी देशाला काँग्रेसने भ्रष्टाचार, आतंकवाद, कुपोषणाच्या खाईत लोटले होते. या कलंकित इतिहासानंतरही काँग्रेस सत्तेची स्वप्ने पाहत आहे. त्यांना अंदाज नाही पूर्वीच्या दोन लोकसभा निवडणुकीत त्यांचा डिब्बा गोल झाला आहे. आपला हा सेवक मोदी नम्रपणे या देशाच्या विकासासाठी ग्वाही देत आहे.
गेल्या दहा वर्षात मोदी सरकारच्या कार्यकाळात सर्वांनी मला पारखले. प्रत्यक्ष शब्द जाणला. आपण सर्वजण मोदींना चांगल्या प्रकारे ओळखता तर दुसरीकडे काँग्रेस इंडिया आघाडीत नेतृत्वासाठी महायुद्ध सुरू आहे. इतका मोठा भारत देश आहे. यामध्ये इंडिया आघाडीला विश्वासू नाव आणि चेहरा नाही. अशा आघाडीच्या हाती कुणी सत्ता देईल का असा सवाल नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला.
पाच वर्षात पाच पंतप्रधान
हा फॉर्मुला लुटण्यासाठी
काँग्रेसने सत्तेसाठी देशाचे तुकडे केले आहेत. पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा फार्मूला त्यांनी पुढे आणला आहे. तो फॉर्मुला देशात चालवू शकतो का ? त्या दिशेला आपण जाऊ शकतो का? या फार्मूल्यामुळे प्रत्येक वर्षी एक पंतप्रधान या फार्मूल्याने जेवढे लुटता येईल तेवढे लुटणे हाच त्यांचा उद्देश आहे. त्यांना देश चालवायचा नाही. देशाच्या भल्याची काँग्रेसला चिंता नाही. त्यांना मलई खायचे आहे , असा घनाघाती आरोप यावेळी मोदी यांनी केला. नकली शिवसेना असा उल्लेख करत या शिवसेनेत पीएम साठी खूप उमेदवार असल्याचे सांगण्यात येते अशी टीकाही यावेळी मोदी यांनी केली.
महाराष्ट्र हा डॉ. आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारक सामाजिक कार्याचा वारसा सांगणारे राज्य आहे. या महापुरुषांनी राज्यातील वंचित, उपेक्षितांना ताकद आणि प्रेरणा दिली. महाराष्ट्रातील त्या सामाजिक न्यायाच्या धर्तीवर देशभरात उपेक्षित, वंचित घटकांच्या हितासाठी मोदी सरकारने अनेक विकास योजना आणल्या. यशस्वीपणे राबवल्या, असेही मोदी म्हणाले.
काँग्रेसने त्यांच्या साठ वर्षाच्या सत्ता कार्यकाळात काय केले आणि मोदी सरकारने दहा वर्षाच्या सत्ता काळात काय केले हे अवघ्या देशाला माहित आहे. मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात खऱ्या अर्थानं सामाजिक न्यायाची कामे केली. ती यापूर्वी कधीही झाली नव्हती. काँग्रेसने साठ वर्षाच्या सत्ता काळात एससी, एसटी व ओबीसी वर्गाचे हक्क डावले. त्यांचा विकास न करता त्यांच्या व्होट बँकेचा वापर कसा करता येईल ? त्यांना मजबूर करून आपल्या सोबत कसे राहतील असे तत्त्वज्ञान यामागे काँग्रेसचे होते, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला. त्या उलट खऱ्या अर्थाने मोदी सरकारने सामाजिक न्याय दिला. विकास साधला.
सोलापुरात पद्मशाली समाजातील लोक मोठ्या संख्येने आहेत. गुजरातमध्ये पद्मशाली समाजातील कुटुंबांच्या घरी मी अनेक वेळा भोजन केले आहे. त्यांचं मीठ खाल्ले आहे. आज गरिबांची सेवा करून ते कर्ज चुकतं करण्याचा प्रयत्न करीत आहे.
भाजपच्या काळात दोन वेळा
राजकीय आरक्षणाला मुदतवाढ
एससी, एसटीसाठी संवैधानिक रूपात असलेले राजकीय आरक्षण दर दहा वर्षांनी मुदतवढ द्यावी लागते.ही मुदतवाढ भाजपच्या कार्यकाळात देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी भाजपचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात प्रथम मुदतवाढ दिली. त्यानंतर मोदी सरकारच्या कार्यकाळातही राजकीय आरक्षणाची मुदत वाढवली, असेही पंतप्रधान मोदींनी यावेळी स्पष्ट केले.
काँग्रेसने उपेक्षित, वंचितांचे हक्क डावलेले मात्र मोदी सरकारच्या काळात आम्ही कुणाचे हक्क डावलले नाहीत. खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय दिला. सामान्य वर्गातील लोकांना न्याय देण्यासाठी दहा टक्के आरक्षणाची तरतूद केली आहे. या देशातील दलित, उपेक्षित , वंचित यांना जोडण्यासाठी खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय दिला.
गरीब आईचा मुलगा – मुलगी डॉक्टर, इंजिनिअर बनला पाहिजे. यासाठी मराठी भाषेतून डॉक्टर इंजिनिअर व उच्च शिक्षण घेऊ शकतील. यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. काँग्रेसला हे नको होते मात्र मोदी सरकारने त्याला प्राधान्य दिले आहे.
देशात दलित, आदिवासी, ओबीसी नेतृत्व करू शकते मात्र काँग्रेसने ती संधी दिली नाही. यापूर्वीचा इतिहास पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान काँग्रेसने केला.
सन 2014 मध्ये देशात भाजप सरकारला प्रचंड बहुमत जनतेने दिले आणि या टर्ममध्ये दलितांचा मुलगा देशाचा राष्ट्रपती बनला तर त्यानंतर सन 2019 मध्ये इतिहासात प्रथमच आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदी विराजमान करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर हे प्रथमच घडले असल्याचे यावेळी पंतप्रधान मोदी यांनी अभिमानाने सांगितले.
आज देशभरात विधानसभा, विधान परिषद , राज्यसभा, लोकसभा यामध्ये भाजपकडून सर्वाधिक अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत. 60 टक्के एससी आणि एसटीचे लोकप्रतिनिधी असून केंद्रात मंत्री पदावरही कार्यरत आहेत. ते देशाला मोठ्या उंचीवर नेण्याचे कार्य करीत आहेत, असेही मोदी म्हणाले.
इंडिया आघाडीकडे देश हिताचा कोणताही मुद्दा नाही. ते खोटे बोलत आहेत. अफवा पसरवत आहेत. त्यांच्याकडे व्हिजन नाही. यामुळेच काँग्रेस – इंडिया आघाडी ही संविधान बदलले जाणार आहे. आरक्षण रद्द करण्यात येणार असल्याच्या खोट्या आणि फसव्या अफवा पसरवत आहेत. आज संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी आले तरी ते आरक्षण बंद करू शकणार नाहीत मग नरेंद्र मोदी तर काय ? कोणीही आरक्षण रद्द करू शकणार नाही आणि संविधान ही बदलू शकणार नाही, असे नरेंद्र मोदी यांनी यावेळी ठामपणे सांगितले.
काँग्रेसच्या साठ वर्षाच्या कार्यकाळात देशात एससी, एसटी ओबीसी या सामाजिक घटकांचे हाल खराब झाले. मोदींनी याच सामाजिक वर्गांच्या विकासाला प्राधान्य दिले. भेदभाव न करता त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न केले आहेत. देशाच्या संपत्तीत पहिला अधिकार उपेक्षित वंचितांनाच आहे. ही गोष्ट लक्षात घेतली. मोफत रेशन, मोफत घर ,गॅस, पाणी यांची वंचित उपेक्षित घटकांना गरज होती. ती गरज मोदी सरकारच्या काळात पूर्ण केली. या घटकांना योजनांचा लाभ मिळतो की नाही यासाठी रोज पंतप्रधान कार्यालयातून पाठपुरावा केला जातो, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे सरकार रात्रंदिवस राज्याच्या विकासासाठी परिश्रम घेत आहे, असेही ते म्हणाले.
सोलापुरात पूर्वीच्या
मताधिक्याचे रेकॉर्ड तोडा
सोलापूर लोकसभा राखीव मतदार सघातील भाजपचे उमेदवार आ. राम सातपुते हे
सोलापूरच्या विकासासाठी निश्चितच काम करणार आहेत. त्यांना मत देणे म्हणजे थेट मोदींना मत पडणार आहे. येत्या 7 मेला राम सातपुते यांना मोठ्या संख्येने मतदान करा. पूर्वीचे मताधिक्याचे रेकॉर्ड तोडा असे आवाहन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
मोदी सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या जनधन, विश्वकर्मा ,मुद्रा यासह विविध योजनांचा लेखाजोखा यावेळी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी मांडला. मोदी सरकारने कश्मीरमध्ये 370 कलम हटविले. इंडिया आघाडीत संभ्रमाची स्थिती आहे. नियत चांगली असेल तर परिणाम चांगले येतात, असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.
वोट बँकेपेक्षा विकासाला महत्त्व दिले
मोदी सरकारने सामाजिक न्याय दिला. आमची नजर वोट बँकेवर कधीच नाही तर गावाचा, शहराचा विकास झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. मतदार हा प्रथम नागरिक आहे. त्याचा विकास झाला पाहिजे, याला प्राधान्य आम्ही देतो. एखाद्या समाजात किती मतदार आहेत. याचा विचार आम्ही कधी केला नाही मात्र त्यांचा विकास झाला पाहिजे, याचा विचार मात्र निश्चित केला आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.