
आताच्या निवडणुकीत शिंदे साहेबांची लेकही पडणार
जनतेचा कौल हा भाजपालाच राहणार
भाजपचे उमेदवार आ. राम सातपुते यांनी व्यक्त केला विश्वास
सोलापूर : सन 2014 आणि 2019 च्या दोन्ही निवडणुकीत निकालापूर्वीच काँग्रेसने जल्लोष साजरा केला होता. त्यावेळी शिंदे साहेबांचा पराभव झाला होता आणि आताही त्यांनी जल्लोष साजरा केला. यामुळे नेहमीप्रमाणे आताच्याही निवडणुकीत शिंदे साहेबांची लेकही पडणार आहे असे स्पष्ट करतानाच जनतेचा कौल यंदाही भाजपलाच राहणार असल्याचा विश्वास भाजपचे उमेदवार आ. राम सातपुते यांनी व्यक्त केला.
मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना आ. राम सातपुते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीतील सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. देवतुल्य कार्यकर्त्यांचे आभार मानताना ते पुढे म्हणाले, दिवस रात्र कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यामुळे सर्व नेते आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासाला कदापी तडा जाऊ देणार नाही. सर्व मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले. यामुळे सोलापुराकरांचा कौल भाजपला आहे. सोलापूर हा भाजपचा बालेकिल्ला आहे. हे निश्चितच सोलापूरकर या निवडणुकीत दाखवून देतील, असा विश्वासही आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आज मतदाना दिवशी बाचाबाची झाल्याच्या घटना संदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात आमदार सातपुते म्हणाले, निवडणूक म्हटले की घोषणाबाजी होणार, पोलिंग बूथवर हरकत हे होत राहतात.या निवडणुकीत मतदार मोठा विजय मोदीजींना देतील. चांगल्या मताधिक्याने आम्ही विजयी होणार आहोत.
मतदान झाल्यानंतर काँग्रेसने साजरा केलेल्या विजयी जल्लोषसंदर्भात आमदार सातपुते म्हणाले, काँग्रेसची ही पद्धत आहे. यापूर्वी 2014 च्या निवडणुकीत मतदान झाल्यानंतर शहरातील नई जिंदगी, शास्त्रीनगर या परिसरातही जल्लोष साजरा करण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या 2019 च्या ही निवडणुकीत असाच जल्लोष साजरा झाला मात्र या दोन्ही निवडणुकीत काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता आणि यंदाच्याही निवडणुकीत जल्लोष साजरा झाला. त्यामुळे शिंदे साहेबांची लेकही आता पडणार ,असा विश्वास आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेस आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहाजी पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.